स.पो.नि.बेंद्रे यांच्यासह सात पोलिस कर्मचारी निलंबित

जळगाव : मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडण्यात आलेला ६० लाख रुपयांच्या गुटखा प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनचे प्रभारी सचिन बेंद्रे यांच्यासह सात पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निलंबित केले आहे.

यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पाच, मेहुणबारे पोलीस स्टेशनचा एक व मुख्यालयातील एक अशा सात पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. मेहुणबारे पोलीस स्टेशनचे स.पो.नि. सचिन बेंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे ए.एस.आय. नारायण पाटील, हवालदार रामचंद्र बोरसे, प्रवीण हिवराळे, महेश पाटील, मनोज दुसाने, मुख्यालय कर्मचारी नटवर जाधव तसेच मेहुणबारे पोलीस स्टेशनचा रमेश पाटील अशा सर्वांना निलंबित करण्यात आले आहे.

हे गुटखा प्रकरण घडल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी या घटनेच्या तपासाची चौकशी चाळीसगाव परिमंडळाचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्याकडे सोपवली होती. सचिन गोरे यांनी या प्रकरणी संबंधीत सर्वांचे जबाब नोंदवले होते. हा चौकशी अहवाल पोलीस अधीक्षकांकडे गेल्यानंतर स.पो.नि. सचिन बेंद्रे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यां देखील तात्काळ निलंबित करण्यात आले.

१६ ऑक्टोबरच्या संध्याकाळी चाळीसगाव-मेहुणबारे रोडवर गिरणा नदीच्या पुलावर ५७ लाख रुपये मुल्य असलेला गुटख्याचा ट्रक (एमएच १८ एम ०५५३) पकडण्यात आला होता. हा ट्रक तडजोडी अंती सोडून दिल्याचा आरोप चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. या आरोपानंतर ट्रक चालक मसूद अहमद शब्बीर अहमद (३८) व क्लिनर मोहम्मद अय्युब दिन मोहम्मद (५०) यांना अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here