जळगाव : ‘कोवीड-१९’ या संसर्गजन्य विषाणूच्या प्रसारास अटकाव होण्याच्या उद्देशाने तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये जळगाव शहरातील ऑक्सीजन पार्क असलेल्या महात्मा गांधी उद्यान व भाऊंचे उद्यान गेल्या काही महिन्यापासून बंद ठेवण्यात आले होते. जळगाव शहरातील दोन्ही उद्याने शासकिय नियमावलीचे पालन करत सुरु करण्याबाबत भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनला जळगाव मनपा प्रशासनाकडून सुचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार पहाटे 5 ते 10 व सायंकाळी 5 ते 10 या वेळे दरम्यान मंगळवार दि.3 नोव्हेंबर पासून जळगावकरांसाठी दोन्ही उद्याने खुली होणार आहेत.
निसर्गाचा सहवास आणि शितल गारव्यामुळे मानसिक शांती व आरोग्य देखील जपता येते. महात्मा गांधी उद्यान व भाऊंचे उद्यान ही दोन्ही उद्याने त्यासाठी पुरक ठरतात. भाऊंच्या उद्यानातील ‘काव्य दालन’ व श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा जीवनप्रवास तसेच गांधी उद्यानातील ‘मोहन ते महात्मा’ या महात्मा गांधीजींचे जीवनप्रवास आपल्या ज्ञानात भर टाकतो. तसेच सकारात्मक प्रेरणाही त्या माध्यमातून मिळते.
लॉकडाऊन काळात जळगाव जिल्हात घोषीत केलेले व भविष्यात घोषित करण्यात येणारे प्रतिबंधित क्षेत्र वगळता बगीचे, पार्क व सार्वजनीक मोकळ्या जागेतील ठिकाणे मनोरंजनाच्या उद्देशाने सुरु ठेवता येतील.
महात्मा गांधी उद्यान व भाऊंचे उद्यान हे प्रतिबंधीत क्षेत्रात समाविष्ठ नाही. त्यामुळे पुर्व नियोजीत वेळापत्रकानुसार ही उद्याने सुरु ठेवण्यास जळगाव मनपाने मान्यता दिली आहे. शासनाने दिलेल्या सुचना व कोविड संबंधीत नियमांचे पालन त्यासाठी करावे लागणार आहे. भाऊंचे उद्यान व महात्मा गांधी उद्यान जळगावकरांच्या सेवेत दररोज सकाळी 5 ते 10 तसेच सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत खुले राहील.
दोन्ही उद्याने सुरु होणर असल्याची आनंदवार्ता असली तरी नियम पाळूनच उद्यानात प्रवेश करावा लागणार आहे. जळगावातील कोरोना विषाणू संक्रमणाची आकडेवारी कमी होत असली तरी दिवाळी व सण-उत्सवामुळे गर्दी टाळावी लागणार आहे.
गर्दी टाळून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ समजून प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करायला हवे. भाऊंचे उद्यान व महात्मा गांधी उद्यानात येतांना प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यक आहे. सोशल डिस्टंस पाळणे, सोबत सॅनिटायझर असणे, कोरोना संबंधीत वेळोवेळी जाहिर केलेले सर्व शासकिय नियम पाळावे लागणार आहे.
दोन्ही उद्यानांमध्ये सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या वतीने केले आहे.