मुंबई : सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीसांसह राज्य सरकारची बदनामी होण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर दीड लाख फेक अकाउंट उघडण्यात आले होते. सायबर व फॉरेन्सिक विभागाने तसा अहवाल मुंबई पोलिसांना दिला असल्याचे समजते.
यातील बरीच खाती आता बंद अवस्थेत आहेत. बदनामीची सुरुवात कुणी व का केली यामागील सुत्रधार कोण होता याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांना गृह विभागाने सुचना दिल्या आहेत.
सुशांत सिंग याने १४ जून रोजी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर सोशल मिडीयावर मुंबई पोलिस व राज्य सरकारच्या बदनामी विषयक पोस्ट सुरु झाल्या. मुंबई पोलीस तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप या पोस्टच्या माध्यमातून सुरु होता. या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा सहभाग असून त्यांना वाचवले जात असल्याचा देखील अपप्रचार या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला होता.
सुशांतने आत्महत्या केला असल्याचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या तपासावरील प्रश्नचिन्ह बाजुला झाले. या काळात झालेल्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुंबई पोलिस व राज्य सरकारची बदनामी करण्यासाठी तयार करण्यात आलेले बनावट खाते चीन, नेपाळ व दुबई येथून तयार करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.