जबरी चोरीचा बनाव करणारा चालक अटकेत

यवतमाळ : अडचणीत असलेल्या व्यक्तीला कधीकधी चुकीची बुद्धी सुचते. त्यामुळे तो जास्त अडचणीत येतो. असाच काहीसा प्रकार एका आयशर टेम्पो चालकाच्या बाबतीत घडला. मालकाला देण्यासाठी व्यापा-याकडून घेतलेले आठ लाखाची रोकड बघून त्याने लुटीचा बनाव केला. मात्र तपासाअंती त्याने बनावट कथानक सादर केल्याचे उघड झाले. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला वाहनचालक जास्त अडचणीत आला. यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कामगिरीमुळे हा प्रकार उघडकीस आला व मुळ मालकाचे आठ लाख रुपये देखील वाचले.

वरुड जिल्हा अमरावती येथील कृष्णा ट्रेडर्स या फर्मचे मालक पवन गांधी असुन त्यांच्या मालकीचा आयशर टेम्पो आहे. त्यांच्या आयशर टेम्पो (एमएच २७ बीएक्स ६४६५) यावर फैसल खान महेमूद खान हा गेल्या दोन वर्षापासून चालकाचे काम करत होता.

३ नोव्हेंबर रोजी दुपारी वाहन चालक फैसल खान टेम्पोने १० टन मका व आठ लाख रुपये रोख आर्वी येथून घेवून निघाला होता. आठ लाख रुपयांची रोकड हाती पडल्यानंतर फैसल खान याचे मन सैरभैर झाले.

रात्री सव्वा सात वाजता त्याने मालक गांधी यांना फोन करुन खोटे सांगितले की करळगाव घाटात दोन दुचाकीवर आलेल्या चौघा जणांनी वाहनावर दगडफेक करुन आपल्याजवळ असलेली आठ लाखाची रोकड लुटली आहे.

मालक गांधी यांनी याप्रकरणी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तपास सुरु करण्यात आला. रस्तालुटीचा प्रकार झाल्याची माहिती मिळाल्याने पोलिस अधिक्षक डॉ खंडेराव धरणे यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला.

पोलिस उप विभागीय अधिकारी कु.माधुरी बाविस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. प्रदिप शिरस्कर, ग्रामिण पोलिस स्टेशनचे स.पो.नि. गजानन करेवाड यांनी वाहन चालकाने कथन केलेल्या ठिकाणी आपल्या पथकासह भेट दिली.

वाहन चालक कथन करत असलेली माह्ती आणि तेथील वाहतूकीसह भौगोलीक परिस्थिती लक्षात घेता हा बनाव असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. अशा घटना या परिसरात यापुर्वी कधी घडलेल्या नव्हत्या. ग्रामिण पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक गजानन करेवाड व स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. विनोद चव्हाण यांनी वाहन चालकाकडे कसून चौकशी केली असता हा घटनाक्रम बनावट असल्याचे निष्पन्न होत गेले.

वाहन मालक व व्यापारी पवन गांधी यांनी वाहन चालका विरोधात ग्रामीण पोलिस स्टेशनला लेखी तक्रार नोंदवली. वाहन चालकाने कबुल केले की आपल्याला पैशांची निकड असल्यामुळे आपण हा बनाव केला. चौकशी व तपासाअंती त्याने करळगाव घाटात लपवून ठेवलेले आठ लाख रुपये पोलिसांना काढून दिले.

फैसल खान महेमूद खान (२२) वरुड जिल्हा अमरावती यांस यवतमाळ पोलीसांनी अटक केली. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भूजबळ – पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी कु. माधुरी बाविस्कर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि. प्रदिप शिरस्कर, यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक गजानन करेवाड,पोलिस हवालदार आडे, पोलिस नाईक मेहत्रे, पोलिस हवालदार प्रेमसिंग, राठोड, पो.ना.विनोद राठोड, पो.कॉ. नेवारे, वाघाडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. चव्हाण, हवालदार डांगे, पोलिस नाईक चव्हाण, पाली, पो.कॉ.सलमान, शेख चालक यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here