मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मुख्य विरोधी पक्ष भाजपाचे नेते सध्या आमने-सामने आले आहेत. अर्णब गोस्वामींच्या अटकेवरून भाजपाकडून सेना आणि महाविकास आघाडीवर टीकासत्र सुरु आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान अर्णब गोस्वामींच्या सुरक्षा व आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत फोनवर केलेल्या चर्चेदरम्यान अर्णब गोस्वामींच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याची व त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना भगतसिंह कोश्यारी यांनी अनिल देशमुख यांना केली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता देखील व्यक्त केली आहे.