मडगाव : सॉफ्ट पॉर्न व्हिडीओ प्रकरणी बॉलिवूड स्टार पूनम पांडे व तिचा पती सॅम बॉम्बे या दाम्पत्यांस काणकोण न्यायालयाकडून मिळालेला जामीन रद्द करण्याची मागणी करणारी याचिका तक्रारदार सम्राट भगत यांनी दक्षिण गोवा सत्र न्यायालयात दाखल केली आहे.
न्यायालयाने घालून दिलेल्या वेळेत पूनम व तिचा पती सॅम काणकोण पोलीस स्टेशनला हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांनी जामीनाच्या अटीशर्थीचा भंग केला असल्याचा दावा भगत यांनी केला असून काणकोण पोलिस स्टेशनला तसे निवेदन दिले आहे.
भगत यांच्यावतीने अॅड. धर्मेश वेर्णेकर यांनी सदर याचिका दाखल केली आहे. काणकोण न्यायालयाने पूनम पांडे हिच्यासह तिच्या पतीला जामीन मंजूर करतांना पॉर्न व्हिडीओ शूट करण्याकामी वापरण्यात आलेला कॅमेरा जप्त केला नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
काणकोणचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शानुर अवदी यांनी पूनम व तिच्या पतीला प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त करतांना सहा दिवस सकाळी 10 ते 1 व सायंकाळी 3 ते 6 या कालावधीत पोलीस स्टेशनला हजेरीची अट घातली होती. मात्र रविवारी सकाळी या वेळेत पूनम व तिचा पती पोलीस स्टेशनला आले नाही. त्यामुळे काणकोण पोलिसांनी हा जामीन रद्द होण्यासाठी अर्ज करण्याची मागणी वजा निवेदन भगत यांनी काणकोण पोलिसांना दिले आहे.