नाशिक : सटाणा येथील विस वर्षाच्या विवाहितेवर सलग अठरा दिवस चौघा नराधमांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील मुळाणे येथील चौघांना सटाणा पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.
शहरात केळी विक्रीचा व्यवसाय करणारी महिला 21 ऑक्टोबर रोजी सकाळी भाक्षी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. त्यावेळी भाक्षीच्या खंडेराव महाराज गडाजवळ मुळाणे येथील रहिवासी असलेले सचिन तानाजी खेताडे (३२), भगवान गवळी (३८), पप्पू बंडू नाडेकर (३६) ,संदीप भावडू नाडेकर (४०) या चौघांनी तिची वाट अडवली. त्यांनी तिला दुचाकीवर बळजबरी बसवून दोधेश्वरच्या जंगलात पळवून नेत तिचे अपहरण केले.
त्याठिकाणी त्यांनी तिला बळजबरी मद्यप्राशन करण्यास भाग पाडून तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. हा प्रकार 18 दिवस सुरु राहिला. 8 नोव्हेंबर रोजी महिलेने गोड बोलून चौघांना विश्वासात घेवून माहेरी जाण्याची व्यवस्था करुन देण्यास सांगीतले व स्वत:ची सुटका करुन घेतली.
घरी आल्यानंतर तिने घडलेल्या प्रकाराची माहीती माहेरी व सासरी दिली. चौघा नराधमांनी त्यांचा मोबाईल क्रमांक विवाहितेला दिलेला होता. तो मोबाईल क्रमांक व अत्याचाराचे घटनास्थळ तिने पोलिसांना सांगितले. त्या मोबाईल क्रमांकाच्या लोकेशन नुसार सटाणा पोलिस पथकाने जंगलातील झोपडीवर छापा टाकला.
त्यावेळी पोलिसांना मद्याच्या बाटल्या तसेच काही आक्षेपार्ह वस्तू मिळाल्या. चौघांच्या घराचा शोध लावून त्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची 16 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले.