जळगाव : आज सुवर्ण व्यापारी तथा शाकाहाराचे पुरस्कर्ते रतनलालजी बाफना यांचे निधन झाले. त्यांच्य निधनाबद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी आपल्या संवेदना प्रकट केल्या आहेत. बाफनाजींबद्दल त्यांनी व्यक्त केलेले विचार त्यांच्याच शब्दात पुढीलप्रमाणे.
धार्मिक,आध्यात्मिक प्रवृत्तीचे करुणाशील ह्रदयाचे श्री रतनालाल बाफनाजींचे आज निर्वाण झाले आहे…दिवाळीच्या आनंदपर्वात बाफनाजींचे असे अचानक निरोप घेणे मनाला चटका लावणारे आहे.
बाफनाजींसारखी देवमाणसं शरीररुपाने आपला निरोप घेऊ शकतात मात्र, कार्यस्वरुपात त्यांनी संस्कारित केलेली जीवनमूल्ये आजही शाश्वत राहतील यात शंका नाही.
मानवांसह पशूपक्ष्यांवर जीवापाड प्रेम करणारे कृतीशील समाजसेवक बाफनाजी सर्वांचेच प्रिय होते.
“शाकाहार हाच सर्वोत्तम आहार आहे,” या सत्त्वशील विचाराच्या प्रचारासाठी बाफनाजींनी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केले आहे. शालेय वयापासूनच जीवन सदाचाराचा सर्वोत्तम संस्कार व्हावे, मुलांची जडणघडण उत्तम प्रकारे व्हावी यासाठी देखील त्यांनी अथक परिश्रम घेतले. आदर्श नेतृत्व,कर्तृत्त्व आणि दातृत्त्व यासाठी बाफनाजी सदैव स्मरणात राहतील यात शंका नाही. नंदादीपाप्रमाणे सकल जनांसाठी कायम कार्यरत राहणे हाच विचार असल्याने श्रद्देय मोठे भाऊ तथा भाईसाहेब रतनलालजी यांचे ऋणांनूबंध अधिकच घट्ट होत राहिले.