बारामती : खासगी सावकारीला कंटाळून बारामती येथील व्यापारी प्रीतम शहा लेंगरेकर यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. प्रीतम शहा यांच्या मृत्यूनंतर पाडव्याच्या दिवशी दुकान उघडताच त्यांनी मृत्युपुर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली.
सदर चिठ्ठी आढळून आल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. बारामती पोलिसांनी य प्रकरणी मोठ्या स्वरुपाची कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यासह सहा पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेत त्यांच्या अटकेची कारवाई केली आहे. या अटकेमुळे खळबळ माजली आहे.अटक झालेल्या बड्या लोकांमध्ये नगरसेवकांसह, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
बारामती येथील व्यापारी प्रीतम शशिकांत शहा यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली होती. व्याजाच्या पैशासाठी त्यांचा बंगला नावावर करण्यासाठी त्यांचा मानसिक छळ केला जात होता.
बारामती शहर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रसचे विद्यमान नगरसेवक, कृ.उ. बाजार समितीचे माजी सभापती, तसेच एका निवृत्त पोलिसांच्या मुलासह एकुण नऊ जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे.
प्रीतम शहा यांचा मुलगा प्रतिक शहा याने या प्रकरणी बारामती शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे (भिगवण रोड, बारामती), राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक जयसिंग अशोकराव काटे-देशमुख, (पाटस रोड बारामती), कृ.उ.बा. समितीचे सभापती संजय कोंडीबा काटे (काटेवाडी), विकास नागनाथ धनके (इंदापूर रोड, बारामती), निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा मंगेश ओंबासे (सायली हिल, बारामती), प्रवीण दत्तात्रय गालिंदे (खाटिक गल्ली, बारामती), हनुमंत सर्जेराव गवळी (अशोकनगर, जैन मंदिराशेजारी, बारामती), संघर्ष गव्हाळे (बारामती) सनी उर्फ सुनील आवाळे (खंडोबानगर) अशा नऊ जणांवर पोलिसांनी सावकारी अधिनियम 2014 च्या कायद्यानुसार रितसर गुन्हा दाखल केला आहे.