जळगाव (जिमाका वृत्तसेवा) जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी सुचविल्यानुसार नागरीकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथी औषधाचे वाटप दानशूर व्यक्तींच्या मदतीने जिल्ह्यातील नागरीकांना करण्यात येत आहे. हे औषध वाटप करण्यासाठी मदत व्हावी, म्हणून माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी एक लाख रुपयांचा धनादेश रेडक्रॉस सोसायटीच्या खात्यावर जमा केला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली आहे अशा जवळपास 80 टक्के व्यक्तींमध्ये अत्यंत सौम्य किंवा कोणतीही लक्षणे दिसून येत नाही आणि अशा व्यक्ती सहजपणे कोरोनावर मात करत आहे. आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जे उपाय सुचवले आहे त्यामध्ये आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथी औषधाचाही समावेश आहे.
जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींच्या आर्थिक योगदानातून जिल्ह्यातील 100% कुटुंबांना आर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे वाटप करण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. याकरीता कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी आणि इतर स्वयंसेवकाचे श्रमदान, दानशूर व्यक्तींचे आर्थिक योगदान, जिल्हा प्रशासन आणि रेडक्रॉस सोसायटी, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने आत्तापर्यंत 3 लाख 37 हजार आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधाचे बॉटल्स तयार करण्यात आल्या होत्या. त्याचे वाटप अंगणवाडी सेविका, आशावर्कर, स्वयंसेवक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन मोफत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 11 लाख 50 हजार कुटूंबाना हे औषध मोफत वाटप करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा इंन्सिडंट कमांडर गोरक्ष गाडीलकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमास जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक दानशुर व्यक्ती, संथा, सामाजिक संस्था मदत करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या माहेरच्या जिल्ह्यात असा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु असल्याची माहिती माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना मिळताच त्यांनी तातडीने एक लाख रुपयांचा धनादेश रेडक्रॉस सोसायटीच्या खात्यावर जमा केला आहे.
श्री. गाडीलकर यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी महासंघाने या उपक्रमासाठी यापूर्वीच एक लाख रुपयांची मदत केली असून जिल्ह्यातील इतरही अनेक संस्था मदत करीत आहे. जिल्ह्यातील नागरीकांना या औषधाचे मोफत वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने या उपक्रमास मदत करण्याचे आवाहन श्री. गाडीलकर यांनी केले आहे.