जळगाव : जळगावचे माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश याचा गेल्या 4 नोव्हेंबर रोजी खून झाला होता. या खुनातील एक आरोपी फरार होता. त्या फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री शिताफीने अटक केली आहे.
या गुन्हयातील आरोपी आकाश मुरलीधर सपकाळे (२३) रा.कांचन नगर जळगाव हा गुन्हा झाल्यापासून फरार होता. पोलिस पथक त्याच्या शोधार्थ कार्यरत होते. त्याच्या शोधार्थ विविध पथके तैनात करण्यात आले होते. मात्र तो मिळून येत नव्हता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आकाश सपकाळे हा पाळधी येथे आला होता. त्याला ताब्यात घेण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पो.हे.कॉ.विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, प्रीतम पाटील, नितीन बावीस्कर, रतन गिते यांचे पथक पाळधी येथे दबा धरुन बसले होते. मध्यरात्री पाळधी गावात सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात पथकाला यश आले. पुढील तपासकामी त्याला जळगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.