नाशिक : सिन्नर येथील गोडाऊनसह दुकान फोडणारे चोरटे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हाती लागले आहेत. आंतरजिल्हा चो-या करणारी टोळी उघडकीस आल्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सिन्नर येथील उद्योग भवन आणि संगमनेर नाका परिसरातील अविनाश कार्बो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोडावूनसह न्यु इंडीया ऑटो इलेक्ट्रीक अॅंड बॅटरी या दुकानाचे शटर वाकवून 10 नोव्हेंबर रोजी चोरी झाली होती.
यावेळी कंपनीचे व वाहनांचे इलेक्ट्रीक पार्टस्, लोखंडी मोटर पंप, इलेक्ट्रीक मोटर, ग्राइंडर व्हील यासह दुचाकी व चारचाकी वाहनांच्या बॅट-या असा एकंदरीत ९,२६,५१५ रुपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी, चोरी करुन नेण्यात आला होता. या घटनेबाबत सिन्नर पोलीस स्टेशनला गु.र.न. १०२७/२० भा.द.वि. ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत या गुन्ह्याचा समांतर तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता. या घटनेतील गुन्हेगार हे औरंगाबाद शहरातील असल्याची गुप्त माहिती तपास पथकाला समजली होती. त्यानुसार पथकातील अधिका-यांसह कर्मचारी वर्गाने औरंगाबाद शहरात तपासकामी मुक्काम ठोकला होता. सराईत गुन्हेगार शेख आजिम शेख बादशहा (४६) टाकळी, ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद यास टाकळी परिसरातुन ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने औरंगाबाद व जालना येथील त्याच्या तिघा साथीदारांची नावे उघड केली. साथीदारांच्या मदतीने त्याने सिन्नर येथे घरफोडी केल्याचे कबुल केले.
पोलिसांच्या ताब्यातील आजिम शेख व त्याचे तिघे साथीदार ८ नोव्हेंबरच्या दिवशी नाशिक फ्रुट मार्केटमधे संत्री विकण्यासाठी आले होते. दरम्यान सर्व जण दोन दिवस सिन्नर येथे मुक्कामी होते. मुक्कामात त्यांनी सिन्नर शहरातील संगमनेर नाका परिसरातील दुकानांवर पाळत ठेवली होती.
१० नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांनी बॅटरीचे दुकान व ट्रान्सपोर्ट कपंनीचे गोडाऊन फोडुन त्यातील स्पेअर पार्टस् व बॅट-या असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. तपासात तसे निष्पन्न झाले.
चोरीचा मुद्देमाल वाजिद रफिक चौधरी (२५) रा. वाळुजगाव, ता.जि.औरंगाबाद याच्या साहिल एंटरप्रायझेस भंगार दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. त्याला वाळूज परिसरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली.
आरोपी शेख आजिम व वाजिद चौधरी यांच्या ताब्यातील घरफोडीच्या गुन्हयातील चोरी केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या बॅट-या, इलेक्ट्रीक मोटर, लोखंडी मोटर पंप, वेल्डींग वायरचे बंडल, ग्राईंडर व्हिल, कटींग सिल्क, कंपनीच्या कामासाठी लागणारे इलेक्ट्रीक साहित्य, मोबाईल फोन यासह गुन्हयात वापरलेले आयशर वाहन असा एकुण १० लाख ५२ हजार ९९७ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
शेख आजिम व त्याचे साथीदार आंतर जिल्हा सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापुर्वी औरंगाबाद, जालना, बुलढाणा, पुणे, अहमदनगर जिल्हयात घरफोडीसह चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी आजिमच्या इतर फरार साथीदारांचा शोध सुरु आहे. अटकेतील गुन्हेगारांकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलिस नाईक प्रितम लोखंडे, प्रविण सानप, पो.कॉ. निलेश कातकाडे, हेमंत गिलबिले यांच्या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणला.