पद्मालय येथील यात्रोत्सव राहणार बंद

On: November 23, 2020 7:42 PM

जळगाव : एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थान त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय श्री गणपती मंदीर देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे घेण्यात आला आहे. दि. 29, 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर या तीन दिवसात दरवर्षीप्रमाणे होणा-या त्रिपुरारी पौर्णिमा यात्रेचा उत्सव यावेळी बंद ठेवण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासकिय नियमावलीनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंदीर व्यवस्थापनाच्या वतीने कळवण्यात आले आहे. त्यामुळे या यात्रेची परंपरा खंडीत होणार आहे.

पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर डाव्या आणि उजव्या सोंडेच्या दोन स्वयंभू गणेशमुर्ती विराजमान आहेत. अमोद आणि प्रमोद असे त्यांना म्हटले जाते. श्री गणेशजींची पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात संपुर्ण खान्देशातून भाविक येतात.

वर्षभर करण्यात आलेले संकल्प, व्रत, नैवेद्य, नवस पुर्ण करण्याच्या निमित्ताने त्रिपुरारी पोर्णिमेला पद्मालय येथे मोठ्या प्रमाणात यात्रेचा उत्सव होत असतो. या यात्रेत ग्रामीण भागासह शहरांतून देखील भाविक भक्त येत असतात. या यात्रेच्या निमित्ताने विविध कटलरी, खाद्यपदार्थाची हॉटेल्स, रसवंती, खेळण्यांची दुकाने लावली जातात.

मात्र यावेळी कोरोना विषाणूच्या संसर्गाची भिती कायम आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेसह तीन दिवस देवस्थान दर्शनासाठी देखील बंद ठेवले जाणार आहे. या कालावधीत कुणालाही मंदीर परिसरात खाद्यपदार्थासाठी हॉटेल, कटलरी, दुकान, रसवंती, फेरीवाले यांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

भाविक तथा भक्तांना नवस, नैवद्य, धार्मिक पुजा विधी करता येणार नाही. तीन दिवस देवालय बंद राहणार असून भाविक भक्तांनी सहकार्य करण्याचे आवाहन या निमित्ताने मंदीर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment