जळगाव : नंदूरबारमध्ये ट्रकचालक आणी दुचाकीचालक यांच्यात कट लागल्यावरुन वाद झाला. हा वाद सोडवत असतांना दुचाकीचालकाच्या ताब्यातील दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ट्रकचालकासोबत वाद घालत बघून घेण्याची भाषा करणा-या दुचाकीचालकाला पोलिसांच्या बेड्या पडल्या. नंदुरबार पोलिसांच्या मदतीने त्या दुचाकीचोराला जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
श्रीकांत प्रकाश मोरे (24) रा. अमळगाव ता. अमळनेर हा त्याच्या ताब्यातील दुचाकीने (एमएच 15 बीएच 4533) नंदुरबार येथे जात होता. वाटेत त्याच्या ताब्यातील दुचाकीला ट्रकचा कट लागला. त्यामुळे त्याने ट्रकचालकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. बघता बघता हे प्रकरण वाढत गेले.
स्थानिक पोलिसांनी दोघांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद मिटवल्यानंतर देखील दुचाकीचालक श्रीकांत ट्रकचालकाला तु पुढे चल तुला बघून घेतो अशी भाषा करु लागला. त्यामुळे नंदुरबार पोलिसांनी त्याला पोलिस स्टेशनला आणले. त्याच्या ताब्यातील दुचाकीची कागदपत्रे तपासणीकामी मागीतली असता त्याची वाचा बंद होण्याची वेळ आली. तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला.
त्याच्या बोलण्यात तफावत आणि संशय येवू लागला. त्याची कसून चौकशी केली असता त्याने ती दुचाकी जळगाव येथील जिल्हा क्रिडा संकुलातून चोरली असल्याचे कबुल केले. नंदुरबार पोलिसांनी जिल्हापेठ पोलिसांसोबत संपर्क साधला. नंदुरबार व जळगाव जिल्हापेठ पोलिसातीला आपसी संवादातून दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला.
माहिती मिळताच जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी प्रविण भोसले, हेडकॉन्स्टेबल विजय सोनार यांनी नंदुरबारला धाव घेतली. नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन गाठून त्यांनी संशयित श्रीकांत मोरे व त्याच्या ताब्यातील दुचाकी ताब्यात घेतली. त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर श्रीकांत यास जिल्हापेठ पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
विनयकुमार अक्षयकुमार जोशी (56), नेहरुनगर – जळगाव यांच्या मालकीची ती दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले. विनयकुमार जोशी हे छत्रपती शिवाजी क्रिडा संकुलातील एका फर्ममध्ये नोकरीला आहेत. 23 ऑक्टोबर रोजी जोशी नेहमीप्रमाणे कामाला आले होते. त्यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी कार्यालयाच्या बाहेर उभी केली होती. घरी जाण्यासाठी बाहेर आले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दुचाकी चोरीची तक्रार जिल्हापेठ पोलिसात दिली. अशा प्रकारे जोशी यांच्या दुचाकीचा नंदुरबार येथे तपास लागला.