मुंबई : गेल्या सव्वा वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला आता गती येणार आहे. पोलिस निरिक्षकांच्या बढतीच्या मार्गातील अडथळा आता सरलेला आहे. या बढतीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून अंतीम निश्चितीसाठी तो प्रस्ताव पोलिस मुख्यालयात गेला आहे. मंत्रालयात रखडलेली फाईल अखेर पोलिस महासंचालकांच्या कार्यालयात गेल्यामुळे लवकरच त्यावर कार्यवाही होण्याची आशा संबंधितांना लागली आहे.
बढतीसाठी पात्र पोलिस अधिकाऱ्यांकडून त्यांच्या पसंतीचा संवर्ग मागवला गेल्यानंतर गृह विभागाकडून बदलीचे आदेश निघणार असल्याचे म्हटले जात आहे.
तीन दशकांपेक्षा जास्त काळ सेवा केलेल्या अधिकाऱ्यांचे उपविभागीय अधिकारी, साहाय्यक आयुक्त पदाची पदोन्नती गेल्या 15 महिन्यांपासून प्रलंबित आहे. पदोन्नतीच्या प्रस्तावाची फाईल सामान्य प्रशासन विभागाकडे मान्यतेसाठी पडून होती.
उपअधीक्षक, एसीपीची सध्या 295 पदे रिक्त आहेत. यापैकी 205 जागा भरल्या जातील. 90 पदे सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेला अधीन राहून राखीव ठेवण्यात आली आहेत. मान्यता मिळालेल्यांपैकी निवृत्त, मयत झालेल्यांची नावे वगळून इतरांना बढती देण्यात येईल.