जळगाव शहरात सध्या पाच लाखाच्या वर नागरिक आणि सुमारे पाच लाखापर्यंत वाहने रोज धावत आहेत. त्यामुळे शहरात पार्कींगचा जटील यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी गाळेधारकांचा विषय गाजला होता. नगरपालिका असतांनाच्या काळात शहरात अनेक व्यापारी संकुले निर्माण झाली. त्यात प्रामुख्याने व.वा.गोलाणी मार्केट, फुले मार्केट गोदडीवाला मार्केट, नवे व जुने बी.जे.मार्केट, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट अशी विविध व्यापारी संकुले तयार झाली. नगरपालिकेची महानगरपालिका झाल्यानंतर शहर विस्तारासोबत हॉस्पिटल्सची देखील बाजारपेठ वाढली.
जळगावात रेल्वे स्टेशन परिसर, गोलाणी मार्केट, दाणा बाजार, सुभाष चौक हा गजबजलेला भाग आहे. म.न.पा.च्या सुमारे 18 व्यापारी संकुलातील सुमारे अडीच हजाराच्यावर दुकान गाळ्यांच्या लिजची मुदत संपली आहे. ती मुदत संपल्यावर देखील गाळेधारकांची समस्या मनपा सत्ताधा-यांना सोडवता आली नाही. त्यातच शहर वाहतुकीस शिस्त आणण्याकामी पोलिस वाहतुक नियंत्रण विभागाने वाहनधारकांवर दंडाची आकारणी सुरु केली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी या समस्येच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांनी म्हणून व्यापारी संकुलाच्या पार्कींग जागेत (बेसमेंटमधे) शेकडो दुकाने बांधली गेल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. दोन वर्षापुर्वी तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी शहरातील अनधिकृत बेसमेंटबाबत मनपा नगररचना विभागाला सर्वेक्षण आदेश दिले. त्यानुसार 411 अनधिकृत बेसमेंटधारकांना त्यांचे शॉप अॅक्टचे लायसन्स रद्द करण्याचा इशारा देणारी नोटीस बजावली होती.
शहरातील 65 हॉस्पीटल्सचालकांनी बेसमेंटमधे बेकायदा मेडीकल दुकाने थाटल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे नव्या बस स्थानकनजीक देशपांडे मार्केट, जिल्हा न्यायालयासमोरचे व्यापारी संकुल, म.न.पा. समोर असलेले नाथ प्लाझा, गोधडीवाला मार्केट यासह बळीराम पेठ परिसरातील व्यापारी संकुले आदी भागात बेसमेंटमधे परवानगी नसतांना दुकानांचा महापुर दिसून आल्याची तथ्ये उघड झाली.
वाहन पार्कींगच्या जागेत बेकायदा दुकाने बेसमेंट मधे काढण्याची परवानगी कुणी दिली? ही दुकाने कुणी कुणास विक्री करुन लाखो करोडो रुपये कसे जमा केले? या नव्या प्रश्नांना गुप्ता यांनी पुढे आणले आहे. नगरपालिका – महानगरपालिकेची सत्ता राबवतांना असे अनेक गैरप्रकार सर्वच राजकारण्यांनी परस्परांवर आरोप करतांना देखील खपवून कसे घेतले? असा टोकदार प्रश्न गुप्ता यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.
जळगावचे चाळण झालेले जाळीदार खड्डामय रस्ते ही वेगळीच डोकेदुखी आहे. त्यात व्यापारी संकुलाच्या बेसमेंट मधील शेकडो अवैध दुकाने, हॉस्पीटल्सची अतिक्रमणे पार्कींगची समस्या अधोरेखीत करत आहे. पार्कींग जागेच्या खरेदी विक्रीचा लाखो करोडाच्या घरात जावून पोचणारा खेळ म.न.पा. सत्ताधा-यांनी मात्र रोखण्याएवजी ती भ्रष्ट स्टोरी पुढे खेचण्याचा सपाटा लावण्याचे का केले. त्यामुळे ही समस्या अधिक बिकट झाली आहे.
केवळ पार्कींग समस्येचे रडगाणे गाण्यापेक्षा तात्काळ व्यापारी संकुलातील पार्कींगच्या जागेतील अतिक्रमणे उध्वस्त करुन वाहनांना पार्कींग प्लेस उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे. नेमकी ही कारवाई कोण व कधी हाती घेणार? हाच खरा प्रश्न आहे.
सुभाष वाघ (पत्रकार – जळगाव)
8805667750