नवी दिल्ली : येत्या 1 जानेवारीपासून लँडलाइनवरुन मोबाईलवर कॉल करण्याबाबत नियमात एक बदल केला जाणार आहे. त्या बदलानुसार देशभरात लँडलाइनवरुन मोबाईलवर काँल करायचा झाल्यास ग्राहकांना 1 जानेवारीपासून मोबाईल नंबर डायल करण्यापुर्वी शून्य (0) लावणे आवश्यक राहणार आहे.
दूरसंचार विभागाकडून ट्रायच्या या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे. ट्रायकडून अशा प्रकारच्या कॉलसाठी मोबाईल क्रमांकापुर्वी शून्य लावण्याची शिफारस 29 मे 2020 रोजी करण्यत आली होती. या निर्णयामुळे दूरसंचार कंपन्यांना अधिक क्रमांक देणे सोयीचे होईल.
दूरसंचार विभागाकडून 20 नोव्हेंबर रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. त्या परिपत्रकानुसार लँडलाइनवरुन मोबाईल क्रमांक डायल करण्याच्या पद्धतीत बदल करण्याबाबत ट्रायच्या शिफारशीला मान्यता दिली आहे. यामुळे मोबाईल आणि लँडलाइन सेवांसाठी पुरेशा प्रमाणात क्रमांक देण्याची सुविधा उपलब्ध होईल. सध्या ही सुविधा केवळ आपल्या क्षेत्राबाहेर कॉल करण्यासाठी उपलब्ध आहे.
दूरसंचार कंपन्यांना या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीकरीता 1 जानेवारीपर्यंतचा अवधी दिला आहे. डायल करण्याच्या पद्धतीत या बदलामुळे दूरसंचार कंपन्यांना मोबाईल सेवेसाठी 254.4 कोटी अतिरिक्त क्रमांक देण्याची सुविधा उपलब्ध होईल.