जळगाव : शतपावली करणाऱ्या पोलिसासह तरुणाचा मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास एलसीबी पथकाने आज बुधवारी अटक केली आहे. ताब्यातील चोरट्याने मोबाईल चोरीची कबुली दिली आहे. शुभम भिमराव वानखेडे (24) राहुलनगर, भुसावळ असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला नियुक्तीला असलेले हे.कॉ. युवराज नागदुल तसेच विशाल विलास जैन (30) श्रीरामनगर, भुसावळ हे गेल्या 6 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी यावल नाका शतपावली करत असतांना काही वेळासाठी रस्त्याच्या बाजुला बसले होते. त्यावेळी दोघांच्या शेजारी येऊन बसलेल्या शुभमने दोघांचे मोबाईल लांबवले होते.
या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान तपासादरम्यान एलसीबीचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या माहितीनुसार शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, रणजीत जाधव, इद्रीस पठाण यांच्या पथकाने शुभमला ताब्यात घेत अटक केली. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपासकामी त्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.