जळगाव : दुकानदाराच्या ताब्यातील रक्कम व मोबाईल बळजबरी हिसकावून पळून गेलेल्या दोघा चोरट्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे.
2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील शाहु नगर भागातील कपाट विक्रेता विलास मुरलीधर नाईक हे दुकानात एकटे होते. त्यावेळी सुरुवातील एक अज्ञात इसम त्यांच्या दुकानात आला. त्याने दुकानदार विलास नाईक यांना कपाटाची मागणी केली. आपल्याकडे कपाट शिल्लक नसल्याचे विलास नाईक यांनी त्यास सांगितले. त्यानंतर लागलीच दुसरा इसम दुकानात चाकू घेवून आला.
चाकू घेवून आलेल्या इसमाने लागलीच दुकानाचे शटर बंद केले. त्यावेळी दुकानदार नाईक आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत असतांना अगोदर आलेल्या इसमाने नाईक यांच्या शर्टाच्या खिशातील एक हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. दरम्यान दुस-याने टेबलावरील मोबाईल ताब्यात घेत दोघांनी शटर उघडून पळ काढला.
या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला भाग – 5 गु.र.न. 206/20 भा.द.वि. 392, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु होता.
जबरी चोरी करणा-या इसमांचा धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्यानजीक वावर सुरु असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदाराकडून समजली होती. त्या अनुशंगाने त्यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, स.फौ.विजय पाटील, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, दिनेश बडगुजर, प्रीतम पाटील, राहुल पाटील, नरेंद्र वारुळे, नितीन बाविस्कर अशांना त्या परिसरात तपासकामी रवाना केले होते.
या पथकाने मुसळी फाटा परिसरातून दिपक चैनराज ललवाणी (32) रा.मुसळी फाटा, ता.धरणगाव जि.जळगाव आणि दिपक भिका चव्हाण (32) रा.इंद्रनिल सोसायटी, जळगाव या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवून त्यांच्याकडून माहिती घेतली. दोघा इसमांनी पोलिस पथकाला आपल्या ताब्यातील चोरी केलेला मोबाईल हस्तगत केला. दोघांना पुढील तपासकामी जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.