प्रियकर विशालच्या मिठीत सोनाली जायची खुशाल ! पत्नीच्या हरकतीमुळे जग सोडून गेला पती विशाल !!

अहमदनगर : अहमदनगर तालुक्यातील देहरे या गावी एका सामान्य शेतकरी कुटूंबात विशाल हापसे याचा जन्म झाला होता. विशाल हापसे यास पोलिस होण्याची खुप इच्छा होती. त्यादृष्टीने त्याने प्रयत्न सुरु केले होते. सकाळी लवकर उठून रनिंग करणे, लांब उडी, उंच उडी यासह पोलिस भरतीसाठी आवश्यक सर्व कसरतींचा तो सराव करत होता. त्याच्या या प्रयत्नांना अखेर यश आले. सन 2002 साली तो अहमदनगर पोलिस दलात दाखल झाला.

कुठलीही तक्रार अथवा सबब न सांगता तो नियुक्तीच्या जागी लागलीच हजर होत असे. सुटी मिळाली नाही तरी त्याची कुरबुर रहात नव्हती. वरिष्ठांचे आदेश आणी त्याचे पालन असा त्याचा शिरस्ता होता. पोलिस दलात नोकरी लागल्यानंतर लवकरच विशाल हापसे याचे लग्न  ठरले व झाले. सोनाली सोबत विवाह झाल्यानंतर त्याच्या संसार वेलीवर साईश्वर आणि वेदीका या पुत्र व पुत्रीचे आगमन झाले. एकंदरीत विशालचा संसार व्यवस्थित सुरु होता.

सन २०१४ मधे लोणी पोलीस स्टेशन येथे नेमणूकीला असतांना त्याची बदली श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला झाली होती. बदलीचे आदेश मिळताच विशालने लागलीच पत्नी सोनाली, मुले साईश्वर अन् वेदिका यांच्यासह नियुक्तीच्या जागी आपला संसार हलवला. तो लागलीच श्रीरामपुर तालुका पोलिस स्टेशनला वरिष्ठांना मानवंदना देत हजर झाला.

श्रीरामपूर येथील म्हाडा पोलिस लाईनमधे तो रहात होता. या पोलिस लाईन मधील रहिवास त्याच्यासाठी दुर्दैवी ठरला. या ठिकाणी त्याची ओळख विशाल खंडागळे या पोलिस कर्मचा-यसोबत झाली. विशाल हापसे आणि विशाल खंडागळे हे दोघे विशाल पोलिस कर्मचारी एकाच पोलिस लाईनमधे रहात होते. दोघे एकाच खात्यात नोकरीला होते. त्यामुळे सरळ स्वभावाच्या विशाल हापसे याने अविवाहीत विशाल खंडागळे याच्याशी मैत्री केली व विश्वास टाकला.

अधुनमधून  अविवाहीत विशाल खंडागळे  याचे विवाहीत विशाल हापसे याच्या घरी जाणे येणे सुरु झाले. येथेच विशाल हापसेच्या दुर्दैवाचा फेरा सुरु झाला. विशाल हापसे यास छिचोर वृत्तीचा शेजारी विशाल खंडागळे याच्या रुपाने मिळाला होता. विशाल खंडागळे याच्याशी मैत्री केल्यानंतर विशाल हापसे याची मानसिक शांतता भंग पावली.

अविवाहीत विशाल खंडागळे याची नजर विशाल हापसे याची पत्नी सोनालीवर पडली होती. दोघांची नजरानजर होण्यास आणि मैत्री होण्यास वेळ लागला नाही. विशालची पत्नी सोनाली देखील कळत नकळत पोलिस लाईन मधे राहणा-या अविवाहीत विशाल खंडागळे कडे आकर्षीत झाली होती. वास्तविक सोनाली ही एक विवाहीता होती. तिचा पती विशाल हापसे हा एक सरळमार्गी पोलिसकर्मी होता. 

मात्र तिला पती विशालपेक्षा घराजवळ कॉलनीत राहणारा तो “विशाल” जवळचा वाटत होता. तिने त्या विशालला प्रियकर मानले होते. पती विशाल व प्रियकर देखील विशाल मात्र तिला त्या विशालमधे जास्त जवळीकता वाटली होती.

आता पोलिस खाते म्हटले म्हणजे केव्हा, कुठे व कशी ड्युटी लागेल हे काही सांगता येत नाही. सुटी मागीतली म्हणजे लवकर मिळत नाही. असे असले तरी विशाल हापसे जी ड्युटी मिळेल ती विनातक्रार करत असे. त्याच्या याच स्वभावाचा गैरफायदा विशाल खंडागळे याने घेण्याचे ठरवले.

पती विशाल समोर असला म्हणजे सोनाली नाममात्र त्याची रहात होती. मात्र पती विशाल नोकरीला गेला म्हणजे ती प्रियकर विशालची होत असे. विशाल हापसे याची दोन्ही मुले लहान होती. मात्र त्याचा मोठा मुलगा साईश्वर याला काही प्रमाणात आई सोनालीच्या हालचाली कळत होत्या.

विशाल हापसे कधी एकदा नोकरीला जातो व त्याच्या नोकरीच्या वेळेत कधी आपल्याला रिकामा वेळ मिळतो याची विशाल खंडागळे अधाशासारखी वाट बघत असे. जेव्हापासून विशाल हापसे लोणी पोलिस स्टेशनमधून श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनला बदलून आला होता, तेव्हापासून विशाल खंडागळे याची नजर त्याची सोनालीवर खिळून बसली होती.

एके दिवशी विशाल हापसे याची बंदोबस्तकामी ड्युटी लागली. नेमकी ही संधी साधून संधीसाधू विशाल खंडागळे हा मुद्दाम सिक मधे गेला. बंदोबस्तकामी आपली देखील ड्युटी लागणार हे विशाल खंडागळे यास अगोदरच कुणकुण लागली होती. त्यामुळे त्याने अगोदरच सिक लिव्हवर जाण्याची तयरी करुन ठेवली होती. सिक लिव्ह घेतल्यानंतर खंडागळे म्हाडा पोलिस लाईनमधील घरीच थांबला. हापसे ड्युटीवर रवाना होताच सोनालीने तिच्या दोन्ही मुलांना बाहेर काहीतरी कामानिमित्त बाहेर पाठवून दिले. आता ग्रीन सिग्नल असल्याचे समजताच कानोसा घेत घेत खंडागळे याने हापसेच्या घरात प्रवेश केला. त्यादिवशी दोघे जीव एका खोलीत बंद झाले होते. दोघांनी आपली सर्व प्रकारची तगमग शांत करुन घेतली. त्यानंतर जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात खंडागळे बाहेर येत आपल्या खोलीत निघून गेला.   

एकाच खात्यात नोकरीला असलेला आपला सहकारी गद्दार असल्याचे विशाल हापसे याच्या लक्षात आले होते. त्याला पत्नी सोनालीच्या संशयास्पद हालचाली समजत होत्या. घाव केल्यानंतर ज्यावेळी रक्त निघत नाही तेव्हा तो घाव करणारा नक्की आपलाच जवळचा कुणीतरी असतो. तशीच गत विशाल हापसे याची झाली होती. तो घाव त्याच्या पत्नीनेच त्याच्याशी गद्दारी करुन केला होता. “आपलेच गद्दार” अशी गत विशाल हापसे याची झाली होती.

पत्नी सोनालीचे आपल्याच खात्यातील विशाल खंडागळे याच्याशी संबंध असल्याची जाणीव हापसे याला झाली होती. संसाराचे हित लक्षात घेवून त्याने रागावर नियंत्रण ठेवत हा प्रकार त्याचा भाऊ देवेंद्र याच्या कानावर घातला. विशाल हापसे याचा धाकटा भाऊ देवेंद्र, काही निवडक नातेवाईक व स्वत: विशाल हापसे असे सर्व जण सन 2019 मधे तत्कालीन डीवायएसपी राहुल मदने यांना जावून भेटले. त्यांनी विशाल हापसे याची पत्नी सोनाली व कर्मचारी विशाल खंडागळे यांच्या संबंधाची तपशीलवार माहिती डीवायएसपी मदने यांना कथन केली.

डीवायएसपी मदने यांनी विशाल खंडागळे यास कार्यालयात बोलावून त्याची कानउघाडणी केली. या कानउघाडणीनंतर खंडागळे याची बदली शिर्डी पोलिस स्टेशनला करण्यात आली. मात्र “कामातुरांना ना लाज ना लज्जा” असा प्रकार  विशाल खंडागळे याच्या बाबतीत झाला होता. बदली झाल्यानंतर देखील त्याचे सोनालीसोबत फोन कॉल व चॅटींग सुरुच होते. हा प्रकार तिचा मुलगा साईश्वर याला समजत होता. त्याने हा प्रकार त्याचे काका देवेंद्र यांना सांगितला होता. आपली तक्रार साईश्वर याने त्याचे काका देवेंद्र हापसे याच्याकडे केली असल्याचे सोनालीला समजली.त्यावेळी तिने साईश्वर यास तुला पाहून घेईन असा दम दिला. सोनालीच्या वागण्यात बदल होत नसल्याचे व  ती खंडागळे याचा नाद सोडत नसल्याचे हापसे याच्या लक्षात आले होते.

त्यामुळे हापसे याचा भाऊ देवेंद्र याने काही निवडक नातेवाईकांसह शिर्डी उपविभागाचे तत्कालीन डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांची भेट घेतली. विशाल खंडागळे याच्यावर कारवाई होण्यासाठी यावेळी लेखी तक्रार देण्यात आली. शिर्डी येथे बदली झाल्यानंतर देखील खंडागळे याच्या वर्तणूकीत तसूभर देखील बदल झाला नव्हता.

डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी यावेळी खंडागळे याची कानउघाडणी केली. यावेळी विशाल हापसे याचीच बदली सप्टेबर 2020 मधे राहुरी येथे करण्यात आली. राहुरी येथे बदली झाल्यानंतर विशाल हापसे राहुरी शहरातील तनपुरे गल्लीतील भाड्याच्या घरात राहू लागला. मात्र मोबाईलच्या माध्यमातून सोनाली आणि तिचा प्रियकर विशाल खंडागळे यांच्यातील संवाद कायम राहिला. या माध्यमातून खंडागळे यास हापसे याचे लोकेशन समजत होते. त्यानुसार तो तिच्या मागावर रहात होता. एके दिवशी तो तिला राहुरी येथे देखील येवून भेटून गेला. या सर्व प्रकाराला विशाल हापसे पार वैतागून गेला होता. त्याचे कामात मन लागत नव्हते. त्याच्याकडून कामात किरकोळ चुका होवू लागल्या.

पुन्हा विशाल हापसे व त्याचा भाऊ देवेंद्र हापसे यांचे जवळचे नातेवाईक एकत्र आले. आता केवळ बदली हा या समस्येवरील उपाय नसल्याचे सर्वांच्या लक्षात आले होते. दिवाळी आटोपल्यानंतर 17 नोव्हेंबर 2020 रोजी हापसे याचा भाऊ देवेंद्र याच्यासह काही निवडक नातेवाईक विशाल हापसे याच्या घरी राहुरी येथे जमले. तेथे त्यांनी या प्रश्नाचे मुळ ठिकाण असलेल्या सोनालीस समजावण्याचा प्रयत्न केला. तिच्या आईवडीलांना तेथे बोलावून घेण्यात आले. सर्वांनी मिळून आता विशाल खंडागळे याच्या शेवगाव येथील घरी जावून  त्याला समजावून सांगण्याचे नियोजन केले. सर्व जण राहुरी येथून शेवगाव येथे त्याला व त्याच्या जवळच्या नातेवाईकांना भेटण्यास गेले.

या सर्व घडामोडी लक्षात घेता आता काहीतरी निर्णय होणार याची कुणकुण सोनालीला लागली. तिने लागलीच मोबाईलच्या माध्यमातून सर्व घटनाक्रम प्रियकर विशाल खंडागळे याच्या कानावर घातला. सर्व जण आपल्या घरी येण्यास निघाले असल्याची माहिती खंडागळे यास समजली. त्यामुळे सतर्क झालेल्या विशालने घरी जाण्याचे टाळले. तो घरी गेलाच नाही. घरी विशाल खंडागळे याची आई त्यांना भेटली. सर्वांनी मिळून त्याच्या आईला समजावून सांगीतले की तुमचा मुलगा विशाल यास थोडे समजावून सांगा. त्याच्यामुळे एक संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. विशाल खंडागळे याच्या आईला बराच वेळ समजावून सांगीतल्यानंतर सर्व जण पुन्हा आपल्या घरी येण्यास निघाले. त्यानंतर देखील सर्व नातेवाईकांनी विशाल खंडागळे व सोनाली या दोघांना समजावण्याचा पुरेपुर प्रयत्न केला.

शुक्रवार दि. 20 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी देवेंद्र घरी होता. त्यावेळी त्याचा भाऊ विशाल हापसे याने त्याला फोन केला. विशालने देवेंद्रला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले.

व्हिडीओ कॉलवर विशाल देवेंद्र यास म्हणाला की, ‘माझी बायको सोनालीचे विशाल खंडागळे याच्यासोबत संबंध आहेत. तसे तिने कबुल केले असून ती मला आमच्यातून बाजुला होण्यास सांगत आहे. नाहीतर मारुन टाकण्याची धमकी देत आहे” पुढे बोलतांना विशालने देवेंद्र यास म्हटले की मला तुला एकदा बघायचे आहे. मी विषारी औषध प्राशन केले आहे. असे बोलता बोलता विशाल हापसे जमीनीवर कोसळला.

व्हिडीओ कॉलवर हा प्रकार बघून देवेंद्र यास धक्काच बसला. तो लागलीच देहरे येथून राहुरीकडे निघाला. रात्री साडे आठ वाजता विशालच्या घरी गेल्यावर तेथील लोकांनी त्याला सांगीतले की विशाल यास डॉ. कुलकर्णी यांच्या दवाखान्यात नेण्यात आले आहे. दरम्यान विशाल याची तब्येत खालावल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी प्रवरा हॉस्पीटल मधे नेण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले.शनिवार 21 नोव्हेंबर रोजी विशाल हापसे याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

विशालचा अंत्यविधी आटोपल्यानंतर राहुरी पोलिस स्टेशनला विशालचा भाऊ देवेंद्र रामराव हापसे याच्या फिर्यादीनुसार विशाल हापसेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली त्याची पत्नी सोनाली हापसे, तसेच शिर्डी पोलीस स्टेशन येथे नियुक्तीला असलेला पोलीस नाईक विशाल खंडागळे या दोघांविरुद्ध गु.र.न. 2003/2020 भा.द.वि. 306, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सोनाली हापसे हिस अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील दुसरा संशयीत पोलिस नाईक विशाल खंडागळे हा वृत्त लिहीत असेपर्यंत फरार होता.

श्रीरामपूर पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे व त्यांचे सहकारी हेड कॉन्स्टेबल विठ्ठल राठोड, पोलीस नाईक निलेश मेटकर, महिला पोलीस नाईक सुर्यवंशी, महिला पोलीस कॉन्स्टेबल मनिषा गुंड असे सर्वजण या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here