जळगाव : वाळू माफीयांनी जिल्ह्यात वाळूचे अवैध उत्खनन आणी वाहतुकीचा जणू काही हैदोस घातल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात वाळू माफियांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्हाधिका-यांच्या नियंत्रणाखाली अवैध वाळू उत्खनन आणी वाहतूकीवर यंत्रणेच्या माध्यमातून आळा घालण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र कित्येक घटनेच्या माध्यमातून यंत्रणाच गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचे दिसून आले आहे.
सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी अवैध वाळू प्रकरणी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यांना देखील वाळू व्यावसायीकांकडून धमक्या व धक्काबुक्की करण्याचे प्रकार यापुर्वी घडले आहे. वाळू व्यावसायीकाची बातमी का छापली म्हणून महाराष्ट्राचा मानबिंदू म्हटल्या जाणा-या दैनिकाच्या प्रतिनिधीला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार आज घडला.
दि. 2 डिसेंबर रोजी सामाजीक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांची तलाठी आप्पासोबत फोनवरील संभाषणाची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिप मधे वाळू व्यावसायीकाच्या वाहनाच्या क्रमांकाचा उल्लेख झालेला आहे. तसेच तलाठी बोलतांना घाबरलेला आहे.
या क्लिपबाबत वृत्त का प्रसिद्ध केले याचा जाब विचारत संबंधीत वाळू व्यावसायिकाने पत्रकारास बेदम मारहाण केली आहे. वास्तविक ज्या प्रतिनिधीला मारहाण झाली त्याच्याकडे महानगरपालिकेच्या बातम्यांचे संकलन करण्याचे काम आहे. त्याचा या बातमीसोबत कुठलाही संबंध येत नाही. संबंध येत असला तरी मारहाणीचा प्रकार निश्चितच चुकीचा आहे. या घटनेचा निषेध होत असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत विचार सुरु असल्याचे समजते.