यवतमाळ : यवतमाळ पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या कार्यालयाच्या चाब्यांच्या गुच्छा चोरीला जाण्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली, तथापी याप्रकरणी कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. या घटनेचा पंचनामा करण्यात आला. कायम बंदोबस्तात असलेल्या पोलिस अधिक्षक कार्यालयात चोरीचीघटना उघडकीस आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात हा चर्चेचा विषय झाला आहे.
पोलिस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनाच आपल्या दालनाबाहेर ताटकळत उभे राहण्याची वेळ या घटनेमुळे आली. खुद्द पोलिस अधिक्षक कार्यालयात आले तरी त्यांचे दालन बंद होते. शिपायाने चाब्यांची सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर देखील चाव्या सापडल्या नाहीत. चाव्या सापडत नसल्यामुळे पोलिस अधिक्षकांना संताप व्यक्त करण्याची वेळ आली. त्यांनी तात्काळ या घटनेप्रकरणी पंचनामा करण्यासाठी डिवायएसपी माधुरी बाविस्कर यांना बोलावले.
काही वेळाने या घटनेप्रकरणी दुसरा धक्का सर्वांना बसला. त्याचे झाले असे की चाव्या कुणी चोरल्या याचा शोध घेण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगीतले. त्यावेळी लक्षात आले की गेल्या काही दिवसांपासून या कार्यालयाचे सीसीटीव्ही बंद आहे. त्यामुळे पोलिस अधिक्षकांच्या रागाचा पारा अजुनच चढला.
अखेर या कार्यालयाचे कुलुप तोडण्याची वेळ आली. एस.पी. यांचे दालन, डीएसबी कार्यालयाचे दालन, स्टेनो कक्ष, व्हीजीटर कक्ष, उप अधिक्षक (गृह) यांच्या कक्षाचे कुलूप तोडावे लागले. यापुर्वी या घटनेचा पंचनामा करण्यात आला.
या घटनेपुर्वी पोलिस अधिक्षकांच्या बंगल्यातून चंदनाची झाडे चोरट्यांनी गायब केली होती. आता थेट पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या चाब्या गायब करुन चोरांनी जणू काही आव्हान दिले आहे.