जळगाव : भागीदारीत प्लॅस्टिक दाण्याची कंपनी टाकण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद सलीम पटेल असे अटक करण्यात आलेल्या संशयितांचे नाव आहे.
जळगाव येथील रहिवासी जावेद पटेल याने गुजरात राज्यातील सुलेमान इस्माईल दिलेर (रा.जलारपूर – नवसारी) या शेतकऱ्यास प्लास्टिक दाण्याची भागीदारीत कंपनी टाकण्याचे आमिष दाखवले होते. या व्यवसायासाठी भागीदारीतील गुंतवणूक म्हणून जावेद पटेल याने सुलेमान दिलेर याचेकडून सुरुवातीला 7 लाख रुपये घेतले. त्यानंतर मात्र जावेद पटेल याने कंपनी सुरु करण्यास वेळोवेळी टाळाटाळ केली. आपली फसवणूक होत असल्याचे सुलेमान याच्या लक्षात येवू लागले. त्यामुळे त्याने जावेद कडे आपली रक्कम मागण्यास सुरुवात केली. बरेच दिवस फिरवाफिरव केल्यानंतर जावेदने सुलेमान यास सात लाख रुपयांपैकी 1 लाख 13 हजार 419 रुपये परत दिले. उर्वरीत 5 लाख 86 हजार 581 रुपये देण्यास मात्र मोठ्या प्रमाणात टाळाटाळ सुरु केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुलेमान इस्माईल दिलेर (47) रा. घर नं. 1096 दिलेर इस्टेट, वेश्मा ता. ता. जलारपुर, जि. नवसारी (गुजरात) याने जावेद सलीम पटेल (35) रा. गणपती मंदिराजवळ, गणेशपुरी, जळगांव याच्याविरुद्ध एम.आय.डी.सी.पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.नं. 1034/2020 भा.द.वि. 420, 406, 409 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर जावेद सलीम पटेल यास 8 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली.