शिर्डी : “साईबाबा” मंदिरात येतांना भारतीय पेहरावात यावे तसेच तोकडे कपडे घालून येऊ नये असे आवाहन साई संस्थान तर्फे करण्यात आले आहे. संस्थान कडून तसे फलक देखील लावले आहेत.
साई संस्थान कडून करण्यात आलेले हे फलक हटवण्यात यावे अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. साई संस्थान कडून हा फलक काढला नाही तर आपण हा फलक हटवू असा इशारा तृप्ती देसाई यांनी यापुर्वी दिला होता. शिर्डी पोलिसांनी तृप्ती देसाई यांना सुरक्षेच्या कारणास्तव 8 ते 11 डिसेंबरमधे शिर्डीत येण्यास बंदीची नोटीस दिली होती. मात्र तृप्ती देसाई यांनी ती नोटीस धुडकावून लावत शिर्डीत प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते.
आज दुपारी पुणे – अहमदनगर रस्त्यावरील सुपे टोल नाक्यावर 100 कि.मी. अगोदरच देसाई यांना त्यांच्या ताफ्यासह अडवण्यात आले. आज मानवी हक्क दिन असल्यामुळे आम्ही आमच्या हक्कासाठी लढत असल्याचे तृप्ती देसाई यांनी यावेळी म्हटले. मात्र आज आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावले जात असल्याचे देसाई यांनी म्हटले.
नगर पंचायतीच्या आदेशानुसार पोलिसांनी जर मला शिर्डीत येण्यास बंदी घातल्याची नोटीस पाठवली आहे तर पोलिसांसोबत चर्चेची तयारी असल्याचे देसाई यांनी पुढे बोलतांना म्हटले.