जळगाव : विना परवाना गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सांगलीच्या तिघा तरुणांना चोपडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी चोपडा शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
संदीप आनंदा निकम (28) बुधगाव, ता. मिरज, विशाल गणेश कांबळे (26) तसेच प्रदीप अरुण साबळे (35), दोघे रा. माधवनगर, ता. मिरज अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गुरुवारी दुपारच्या वेळी चोपडा शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकाने चारचाकी वाहन (एमएच 50 ए 0807) या संशयीत वाहनाला अडवले. या वाहनात बसलेल्या तिघा तरुणांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान त्यांच्या ताब्यात 30 हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा व 3 हजार रुपये किमतीचे तिन जिवंत काडतुसे, ३ लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन आणि 13 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल असा 3 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तिघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल कारण्यात आला.