पैठण : पैठण येथील गंगेश्वर महादेव मंदिरात एका 25 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह धारदार शस्त्राने गळा चिरलेल्या अवस्थेत गुरुवारी दुपारी मिळून आला. महादेवाच्या पिंडीजवळच तरुणाचा मृतदेह मिळून आल्यामुळे हा अघोरी प्रकार असल्याची चर्चा या निमित्ताने सुरु होती.
पैठण शहरातील जुने कावसन येथे काही दिवसांपुर्वी तिहेरी हत्याकांड झाले होते. या घटनेची शाई अजून वाळलेली नाही. दरम्यान या घटनेमुळे पैठण शहरात खळबळ माजली आहे. नंदू देवीदास घुंगासे असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी पोलिस पथकाला धारदार कटरचा एक तुकडा मिळून आला आहे. हा खुन आहे की आत्महत्या याचा उलगडा झालेला नाही.
उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम वारे व त्यांच्या सहका-यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पुढील कारवाई सुरु केली. महादेवाच्या पिंडीला लागूनच गुडघ्यावर बसलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मयत तरुणाचे रक्त पिंडीवर पडत असल्याचे ते दृश्य होते. नंदू घुंगासे याने गंगेश्वर महादेव मंदिरात आत्महत्या केली असावी असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे.