जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरी पूल जकात नाक्याजवळ आज दोघा चारचाकी वाहनांची एकमेकांवर धडक झाली. या अपघातात जखमी चालक कॅबीनमधे अडकून पडला होता. त्यावेळी सुदैवाने स्थानिक गुन्हे शाखेचे हे.कॉ. विजयसिंग पाटील व सुधाकर अंभोरे जात होते.
त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ मालवाहू वाहनाचा दरवाजा तोडून आत अडकलेल्या चालकास बाहेर ओढून काढले. त्याला तात्काळ रुग्णालयात रवाना करण्याची व्यवस्था करण्यात आली. चालकास तात्काळ मिळालेल्या मदतीमुळे त्याचे प्राण वाचले आहे.
अशोक सुकदेव रोकडे (पिंप्राळा) असे जखमी चालकाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे यांच्यासह त्यांच्या मदतीला राजेंद्र पवार, प्रीतम पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील हे देखील धावून आले. जखमी अशोक रोकडे यांचा एक भाऊ चाळीसगाव येथे पोलीस कर्मचारी आहे. त्याला मिळालेल्या मदतीमुळे त्याने विजयसिंग पाटील व सुधाकर अंभोरे यांचे आभार मानले आहे.