उल्हासनगर: कोरोना महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात देशभरातील कनिष्ठ न्यायालय बंद आहेत. सलग तीन महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने आर्थिक विवंचनेतून उल्हासनगर येथील एका वकिलाने काल आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आकस्मित गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१ जुना बस स्टॉप येथील एका इमारतीत उमेश खंडागळे (३७) हे वकील आपल्या कुटुंबासह रहात होते. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता राहत्या घरात गळफास घेत त्यांनी आपली जिवनयात्रा संपवली. या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व तिन वर्षाची मुलगी आहे. वकील संघटनेने याप्रकरणी दुःख व्यक्त केले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नैराश्य व आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश कदम यांनी प्रसार माध्यमांना दिली.