जळगाव : कारच्या डिक्कीतून गहाळ झालेली बॅग दोघा दुचाकीस्वार पितापुत्रांच्या प्रामाणीकपणामुळे मुळ मालकास परत मिळाल्याची घटना आज घडली. सदर किमती दागीने व वस्तू असलेली बॅग एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या हस्ते परत देण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की धर्मेंद्र पाटील (रा. हिरापुर, खंडवा – मध्य प्रदेश) हे नातेवाईकाच्या लग्नानिमित्त 10 डिसेंबर रोजी एमआयडीसी परिसरात आले होते. लग्न आटोपल्यानंतर त्यांनी सोन्याचे दागीने असलेली बॅग त्यांच्या कारच्या डिक्कीत ठेवली होती. त्यानंतर वाटेत ते महालक्ष्मी दाल मिल येथे कामानिमीत्त गेले. तेथून दोन बॅग घेतल्यानंतर त्या ठेवण्यासाठी कारच्या डिक्कीजवळ आले. त्यावेळी त्यांना कारची डिक्की उघडी दिसली. उघड्या कारच्या डिक्कीत ठेवलेली दागीने असलेली बॅग त्यांना गहाळ झाली असल्याचे लक्षात आले.
दरम्यान सीसीटिव्ही फुटेज तपासले असता मोटार सायकलवरील दोघे जण ती बॅग रस्त्यावरुन उचलत असल्याचे त्यांना दिसले. बॅग गहाळ झाल्याबाबत त्यांनी एमआयडिसी पोलिस स्टेशनला धाव घेत खबर दिली. या प्रकरणी खबर देत असतांना पोलिस पथकासोबत चंदनसिंग चव्हाण व त्यांचा मुलगा यश असे दोघे जण ती बॅग घेवून पोलिस स्टेशनला हजर झाले. सदर बॅग रामेश्वर कॉलनी परिसरातील आदित्य चौकात कारच्या डिक्कीतून पडली होती असे त्यांनी सांगीतले. कारचालकास आवाज देखील दिला मात्र ते लक्ष नसल्यामुळे थांबले नाही असे यावेळी चव्हाण यांनी पोलिसांना सांगीतले.
बॅगमधील सर्व वस्तू तपासून पाहिल्या असता धर्मेंद्र पाटील यांचे समाधान झाले. सर्व वस्तू सुस्थितीत असल्याचे त्यांना आढळून आले. ती बॅग व त्यातील वस्तू धर्मेंद्र पाटील यांना पो.नि.प्रताप शिकारे यांच्या हस्ते परत देण्यात आल्या.