चाकूहल्ल्यासह लुटीचा साक्षीदार, चिमुकला रामजी गुन्हा लपवण्यासाठी विशालने केले त्याला स्वर्गवासी

नाशिक : लालबाबू यादव हा तरुण रोजगाराच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातून नाशिक शहरात परिवारासह राहण्यास आला होता. सिंघवापुर जि. बलरामपुर (उत्तर प्रदेश) येथील तो मुळ रहिवासी होता. नाशिक रोड परिसरातील सासनगव रस्त्यावरील गाडेकर मळ्यात असलेल्या भाड्याच्या खोलीत तो रहात होता. मोलमजुरी करुन तो आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवत होता.

लालबाबू यास एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्ये होती. पती – पत्नी व दोन मुले असा त्याचा सुखी चौकोनी परिवार होता. लालबाबूचा मोठा मुलगा रामजी हा अवघा नऊ वर्षाचा बालक तिस-या इयत्तेत शिकत होता. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा बंद होत्या. त्यामुळे तो सध्या घरीच होता. चिमुकला रामजी शेजारी पाजारी कुणाकडेही खेळण्यास जात होता. निरागस रामजीचे सर्वच जण लाड आणी कोडकौतुक करत होते. परिसरातील कोणत्याही तरुणासोबत जावून तो फिरुन येत असे.

मयत रामजीचे वडील

नाशिक रोड परिसरातील गाडेकर मळ्यात जवळपास दहा ते बारा भाड्याच्या खोल्या आहेत. लालबाबू यादव यांच्यासह इतरही श्रमिक वर्गातील भाडेकरी या चाळीत राहतात. या चाळीत विशाल विष्णू गेजगे (24) हा तरुण देखील त्याच्या परिवारासह राहतो. विशालची आई टिळक पथवर भाजीपाला विक्री करते. घरमालकाच्या ओमनी कारने तो त्याच्या आईला घरुन भाजीपाला नेवून देण्याचे काम करत होता. शिवाय नाशिक रोड भागात असलेल्या घरमालकाच्या किराणा दुकानासाठी लागणा-या सामानाची देखील तो वाहतुक करत असे. कधी कधी तो शेजारी राहणा-या रामजीला देखील सोबत फिरायला घेवून जात असे.

विशाल हा गुन्हेगारी वृत्तीचा तरुण होता. त्यामुळे वेळ प्रसंग बघून तो गुन्हेगारी कृत्य करण्यास मागेपुढे बघत नव्हता. मंगळवार 1 नोव्हेंबर रोजी दुपारी तिन वाजेच्या सुमारास घरमालकाने त्याला बोलावले. नाशिक रोड येथील किराणा दुकानातील तेलाचे डबे आणण्याकामी स्वत:ची ओमनी कार त्यांनी विशाल यास दिली. दुकानावर जातांना वाटेत आईला देण्यासाठी त्याने भाजीपाला देखील कारमधे भरला. त्यावेळी कारजवळ रामजी आला. त्याने रामजीला फिरवून आणण्यासाठी कारमधे बसवून घेतले. यासोबत विशालने त्याचा मित्र स्वप्नील याला देखील कारमधे बसवून घेतले. अशाप्रकारे भाजीपाल्यासह रामजी व स्वप्नील यांना सोबत घेत विशाल कारने टिळक पथवरील दिव्या कलेक्शनजवळ आला. भाजीपाला विक्री करणारी त्याची आई वंदना गेजगे हिला त्याने काही भाजीपाला दिला. त्यानंतर राहीलेला भाजीपाला त्याने मिना बाजार, देवळाली गाव, जेलरोड अशा विविध ठिकाणी विक्री केला. या सर्व कामात रात्र झाली.

वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरज बिजली

रात्री सव्वा आठच्या सुमारास घरी जाण्यापुर्वी विशाल व स्वप्नील या दोघा मित्रांनी थकवा घालवण्यासाठी मद्यप्राशन केले. त्यानंतर रामजीसह दोघे मित्र सिन्नर फाट्याच्या दिशेने निघाले. वाटेत उड्डाणपुलाखाली त्यांना विजय आव्हाड या प्रवाशाने हात दाखवून लिफ्ट मागीतली. विजय आव्हाड या प्रवाशाला सिन्नर येथे जायचे होते. विशाल सिन्नरकडे जात नसतांना देखील त्याने प्रवासी विजय यास कारमधे बसवून घेतले.

विशाल व स्वप्नील या दोघा मित्रांनी सामनगाव रस्त्याने कोटमगाव गाठले. त्यावेळी प्रवासी विजय आव्हाड याला शंका आली. गाडी या रस्त्याने का टाकली? असा प्रश्न प्रवासी असलेल्या विजय आव्हाड याने वाहनचालक विशाल गेजगे यास केला. त्यावर त्याने म्हटले की वाटेत मामाकडे भाजीपाला देवून पुढे आपण सिन्नरला जावू. मात्र विशाल व त्याचा मित्र स्वप्नील या दोघांच्या मनात विजय यास लुटण्याचा वेगळाच डाव सुरु होता. त्याचा थांगपत्ता प्रवासी म्हणून बसलेल्या विजय आव्हाड यास लागला नाही.

कोटमगाव कडून हिंगणवेढे गावाच्या अलीकडे निर्मनुष्य ठिकाणी हॉटेल राधिकापासून काही अंतर पुढे विशालने ओमनी उभी केली. स्वप्नीलने विशालच्या मदतीने विजयवर चाकूहल्ला करत त्याला लुटीच्या उद्देशाने जखमी केले. विजयच्या खिशातील अकरा हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच चार हजार रुपये लुटून त्याला गाडीखाली फेकून देण्यात आले. त्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला. चाकुहल्ल्यासह लुटीचा सर्व प्रकार गाडीत बसलेला चिमुकला रामजी भयभीत नजरेने बघत होता.

विजय आव्हाड या प्रवाशाला लुटल्यानंतर विशाल लाखलगाव मार्गे हॉटेल मिर्ची, जेलरोड मार्गे नाशिक रोड येथे आला. याठिकाणी त्याने त्याचा मित्र स्वप्नील यास घरी जाण्यासाठी गाडीखाली उतरवून दिले. यावेळी गाडीत बसलेल्या निरागस रामजीने विशाल यास  म्हटले की “तुमने उस आदमी को चाकू लगा के मोबाईल और पैसा निकाला, ऐसा क्यूं किया? मैं सब बता दूंगा”.

रामजी याचे घर

त्याचे हे बोलणे ऐकताच विशाल मनातून घाबरला. रामजीमुळे आपल्या लुटमारीचे बिंग फुटेल अशी भीती त्याला सतावू लागली. या भितीपोटी विशालने रामजीचा काटा काढण्याचा मनातल्या मनात निर्णय घेतला. आपण केलेल्या लुटीची माहिती रामजी आपल्या घरी सांगणार या भितीने त्याचा कसा बंदोबस्त करायचा याबद्दल त्याच्या मनात  विचारचक्र सुरु झाले. नायगाव रस्त्याने जातांना रस्त्यातच थांबून विशालने अतिशय कृरपणे गाडीतील टॉवेलने चिमुकल्या रामजीचा जोरात गळा आवळून खून केला. बिचारा रामजी त्याला प्रतिकार करण्यात कमी पडला. निरागस रामजीने हात-पाय झटकत जीव सोडला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सिन्नर तालुक्यातील डुबेर गाव शिवारातील निर्जनस्थळी त्याचा मृतदेह टाकून त्याने पळ काढला.

दरम्यान आपला मुलगा रामजी अजुन घरी कसा आला नाही म्हणून त्याचे आईवडील हैरान झाले होते. आपल्या मुलाला विशालने नेले असल्याचे समजल्यानंतर ते विशालची वाट बघत बसून राहिले. रात्री दिड वाजता विशाल घरी परत आला. रात्री उशीरापर्यंत रामजी घरी आला नाही म्हणून त्याचे आई – वडील खुपच अस्वस्थ झाले होते. ते विशाल घरी येण्याची वाट बघत आ वासून बसले होते. विशाल घरी येताच रामजीच्या आई- वडीलांना हायसे वाटले. रामजी घरी आला असे त्यांना वाटले. मात्र गाडीतून विशाल एकटाच उतरल्याचे बघून त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यांनी रामजीची चौकशी सुरु केली. विशालने उडवाउडवीची उत्तरे देत त्यांना सांगितले की, रामजीला आपण रात्री साडेदहा वाजता गाडेकर मळ्यातील मंदिरात सोडले होते. तो अजून घरी कसा आला नाही? असे तोच रामजीच्या आई-वडीलांना मुद्दाम विचारु लागला. त्याच्या उडवाउडवीच्या दिशाभूल करणा-या उत्तरामुळे लालजी यांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हळूहळू हा वाद वाढू लागला.   

त्यांचा आरडाओरडा ऐकून रात्री गस्तीवरील नाशिक रोड पोलीस पथकाने तेथे गाडी उभी केली. पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल विचारपूस सुरु केली. रामजी नावाचा लहान बालक बेपत्ता झाला असून तो दुपारपासून विशालसोबत गेल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. शिवाय रामजीच्या आई-वडीलांनी विशाल याच्यावरच दाट संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला गाडीत टाकून पोलीस स्टेशनला आणले.

पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली अशा सर्वांनी मिळून विशालकडे रामजीची चौकशी सुरु केली. मात्र विशालने  उडवाउडवीची उत्तरे देण्याचे काम सुरुच ठेवले होते. तो काहीतरी लपवत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. अखेर. पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवण्यास सुरुवात केली. तेव्हा कुठे त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. हळूहळू त्याने आपल्यासोबत असलेला मित्र स्वप्निल सोनवणे याची देखील माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी नाशिक रोडला जावून स्वप्निल सोनवणे यास ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणले.

रामजी रात्री आमच्यासोबत असल्याचे स्वप्नील सोनवणे याने कबुल केले. सिन्नरला जाण्यासाठी आमच्या गाडीत एक प्रवासी बसला होता हे स्वप्नील व विशाल यांनी कबुल केले. त्याच्यावर चाकूने वार केल्यानंतर त्याचा मोबाईल फोन व चार हजार रुपयांची लुट केल्याची माहिती दोघांनी दिली. या घटनेच्या वेळी आमच्यासोबत रामजी होता अशी कबुली स्वप्नील याने दिली.

रामजीचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह डुबेरे गावाच्या परिसरात टाकून परतलेल्या विशालने लगेच स्वप्निलचे घर गाठून त्याला बाहेर जेवायला चलण्याचा आग्रह केला होता. मात्र घाबरलेल्या स्वप्निलने नकार दिल्यामुळे विशाल घरी परत आला होता. स्वप्निल त्याच्यासोबत गेला असता तर कदाचीत विशाल त्याचा देखील काटा काढला असता अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली. पोलीस खाक्या दाखवल्यानंतर विशाल पोपटासारखा पटापट बोलू लागला. त्याने सांगितले की लिफ्ट देवून कारमध्ये बसवलेल्या सिन्नरच्या प्रवाशाला चाकूने मारहाण करत त्याच्याकडून लुटलेला मोबाईल व पैशांची माहिती मी घरी माझ्या आई – वडीलांना सांगेन असे रामजी त्याला म्हणाला होता. आपले बिंग फुटेल या भीतीने आपण घाबरल्याचे विशालने कबुल केले. त्या भितीमुळे सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावानजीक  टॉवेलने रामजीचा गळा आवळून खून करण्याचे काम विशालने केले. त्यानंतर त्याचा मृतदेह डुबेरे येथील स्मशान भूमीजवळच्या नदीपात्रात फेकून दिल्याची माहिती विशालने दिली.

माहिती मिळाल्यानंतर विशालला सोबत घेवून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावाच्या स्मशान भूमीनजीक असलेल्या नदीपात्रात रामजीचा मृतदेह पडून होता. त्याच्या गळ्यावर गळफास दिल्याचे वळ दिसत होते. एका निरागस बालकाचा अतिशय क्रूरपणे खून करण्यात आल्याचे स्पष्ट होताच उपस्थितांचे मन हेलावले. पोलिस पथकाने घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा करत कायदेशीर सोपस्कर पार पाडले. त्यानंतर मृतदेह विच्छेदकामी शासकीय रुग्णालयात रवाना केला.  आपण केलेल्या लुटीची वाच्यता रामजी करेल अशी भीती विशाल यास होती. त्यामुळे विशालने निरागस रामजी यास ठार केले होते.

लालबाबू यादव यांच्या फिर्यादीनुसार रामजीचे अपहरण करुन त्याचा गळा दाबून खून केल्याचा गुन्हा विशाल गेंजगे विरुद्ध नाशिक रोड पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला. याशिवाय प्रवासी विजय आव्हाड याच्या फिर्यादीवरुन विशाल गेजगे व त्याचा मित्र स्वप्निल सोनवणे या दोघांविरोधात मोबाईलसह चार हजार रुपये लुटीचा दुसरा गुन्हा नोंद करण्यात आला. दोघा आरोपींना अटक करण्यात आली.

पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त समीर शेख, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी अतिशय कमी कालावधीत या गुन्ह्याचा छडा लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here