स्नेहाची शिदोरी अविरत सुरुच राहणार – अशोकभाऊ जैन

जळगाव : कोरोना आव्हानात्मक परिस्थिती उद्भवल्यानंतर एप्रिल महिन्यापासून भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि जैन इरिगेशन कंपनीच्या माध्यमातून ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम नियमितपणे सुरु आहे. जळगाव शहरातील कुणी उपाशी राहु नये हा उद्देश नजरेसमोर ठेवून स्नेहाची शिदोरी हा उपक्रम सुरुच राहणार असल्याचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी घोषित केले आहे. श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या 83 व्या जयंतीदिनी आयोजीत करण्यात आलेल्या भक्तीसुधारस या कार्यक्रम प्रसंगी अशोकभाऊ जैन यांनी ही घोषणा केली आहे.

‘आपला समाज सातत्य, समर्पण आणि सेवा जोपासणाऱ्या व्यक्तींच्या बळावर उभा आहे. ’ श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या विचारांच्या संस्काराचा हा ठेवा जैन परिवारावर खोलवर रुजला आहे. त्याचीच ही प्रचीती आहे. अशोकभाऊ जैन यांनी मोठ्या भाऊंच्या काही भावस्पर्शी आठवणी यावेळी कथन करत असतांना ही घोषणा केली.
साधारणपणे सन 2015 मध्ये जळगाव शहरातील कुणी नागरीक उपाशी राहू नये असे संवेदनशील विचार मोठ्या भाऊंच्या मनात त्यावेळी सातत्याने येत होते. समाजाकडून आपण भरभरून घेत असतो तसेच आपण देखील समाजासाठी कृतज्ञतापूर्वक नक्कीच काहीतरी केले पाहिजे या जाणीवेतून भोजनाची आवश्यकता असणाऱ्यां सर्व लोकांसाठी सकाळ – सायंकाळ भोजन उपलब्ध करुन देण्याबाबत भवरलालजी जैन उर्फ मोठ्याभाऊंनी अशोकभाऊ जैन यांच्याशी मनमोकळेपणाने आपले विचार व्यक्त केले होते.

एकूणच या संदर्भात काय व कसे नियोजन करता येईल, तसेच या संकल्पनेची अंमलबजावणी कशा स्वरुपाची असेल, त्याचे नेमके स्वरुप निश्चित होत गेले. मात्र प्रत्यक्षात ही संकल्पना सुरु करण्यात सतत व्यत्यय आला. श्रद्धेय मोठ्याभाऊंचे निर्वाण होईपर्यंत ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आली नाही. त्याची सल जैन परिवाराला कायम होती. 25 फेब्रुवारी 2016 रोजी भवरलालजींनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला.

जैन परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले दलुभाऊ जैन यांनी त्यानंतरच्या प.पू. कानमुनींच्या पहिल्या चातुर्मासात भाऊंच्या पवित्र स्मृतीप्रीत्यर्थ जैन समाज बांधवांसाठी मोफत भोजनालयाची व्यवस्था केली. ती सुविचा आजतागायत सुरु आहे.

कोविड-19 या वैश्विक महामारीने संपूर्ण विश्वाला जशी मरणाची दशा दर्शवली तशी जगण्याची देखील दिशा दिली. मनुष्याने मनुष्यासोबत मनुष्याप्रमाणेच संवेदनशील वर्तन करुन सेवाभाव जोपासला पाहिजे. त्यातच आपल्या आयुष्याचे सार्थकत्व आहे या विचारांचे प्रत्यक्ष दर्शन ‘स्नेहाची शिदोरी’ या संकल्पनेच्या माध्यमातून दिसून आले. लॉकडाऊन काळात अनेक प्रकारच्या गंभीर परिस्थिती जनसामान्यांच्या वाटेला आली. त्या परिस्थितीला अनेकांना सामोरे जावे लागले. भोजनाची आवश्यकता असणाऱ्या सर्वांना सेवाभावी वृत्तीने घासातला घास देण्याचा जैन परिवाराचा संस्कार या ठिकाणी देखील कामी आला.

कांताई सभागृहातून 1 एप्रिल 2020 ते 12 डिसेंबर 2020 दरम्यान दोन वेळच्या जेवणाचे जवळपास 8 लाखाच्यावर भोजन पाकिटे उपलब्ध करुन देण्यात आली. स्नेहाची शिदोरी उपक्रम सुरु असतांना मोठ्या भाऊंच्या कायम स्वरूपी भोजन उपलब्ध करण्याची संकल्पना जैन परिवाराच्या मनात होतीच.

‘स्नेहाची शिदोरी’ अव्याहत सुरु रहावी असे जैन परिवाराकडून निश्चित करण्यात आले. मोठ्या भाऊंच्या 83 व्या जन्मदिनानिमित्त ‘स्नेहाची शिदोरी’ कायम राहणार असल्याची घोषणा अशोकभाऊ जैन यांनी केली. काळानुरुप या भोजनालयाच्या बाबतीत योग्य ते निर्णय निश्चितपणे घेण्यात येतील. मात्र ही संकल्पना यापुढे देखील निरंतर सुरुच राहणार असल्यामुळे जळगाव शहरातील कुणीही व्यक्ती उपाशी असला तरी उपाशी झोपणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here