जळगाव : एजंटच्या माध्यमातून जमलेले लग्न होण्याआधीच नववधूने पळून जाण्याचा प्रयत्न फसल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील वडाळा-वडाळी येथे घडला.
फसवणूक झालेल्या नवरदेवाने दिलेल्या फिर्यादीनुसार मध्यस्थी महिला एजंट, नववधूसह सहा जणांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फसवणूकीचा रितसर गुन्हा दाखल झाला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वडाळा-वडाळी येथील अंकुश भाऊसाहेब आमले या तरुणाचा विवाह एजंट संगीताबाई बाबुराव पाटील (औरंगाबाद),अशोक कडू चौधरी (कुंभारखेडा, ता. रावेर), संदेश राजेश वाडे (चिखली, जि. बुलढाणा), अकील मामा (चिखली),रेखाबाई (चिखली), ममता रफीकखान (शहानगर, औरंगाबाद) व इतर दोन – तीन अनोळखी इसम यांनी अंकुश आमले या तरुणाच्या विवाहासाठी मुलगी शोधून लग्न लावून देण्याचे म्हटले होते.
संगीताबाई पाटील हिने अंकुश आमले या तरुणाकडून दिड लाख रुपये घेवून त्याचा विवाह ममता उर्फ रेशमा रफीकखान हिच्यासोबत ठरवला होता.12 डिसेंबर रोजी विवाहाची तारीख निश्चित झाली. लग्नापूर्वी कपडे, सोन्याचे दागिने व लग्नाचा सर्व खर्च नवरदेव मुलाकडे होता.नववधूच्या भूमिकेत ममता बस्ता खरेदीसाठी चाळीसगावला आली होती. लग्नाची खरेदी सुरु असताना ममताने लग्नाआधीच पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला व लग्नास नकार दिला.
भावी नवरदेव अंकुश आमले यांच्या फिर्यादीनुसार या सर्वाविरुद्ध कलम 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.