मुंबई : गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेली मुंबई आणि उपनगरीय लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी येत्या 1 जानेवारीपासून सुरु होणार असल्याचे विधान राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राखण्याच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली मुंबईची लोकलसेवा आता हळूहळू सुरु होत आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा अगोदर सुरु करण्यात आली. त्यानंतर घटस्थापनेपासून महिला वर्गाला देखील मुंबईच्या उपनगरीय लोकलचे दरवाजे उघडण्यात आले होते. दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
त्यामुळे लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचा विचार लांबणीवर टाकण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह परिसरातील रुग्णसंख्या बरीच नियंत्रणात आली आहे. त्या दृष्टीने राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोकल सेवा सुरु करण्याबाबत माहिती दिली.
मुंबई आणि राज्यातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे लोकलसेवा सुरू होण्यात अडचण नसल्याचे वाटत आहे.