जळगाव : यावल – रावेर मतदारसंघाचे भविष्यातील नेतृत्व म्हणवले जाणारे भुसावळचे रहिवासी अनिल छबीलदास चौधरी, जळगावचे भगत बालाणी यांच्यासह इतरांवर एमआयडीसी पोलिस स्टेशनला दंगा केल्याप्रकरणी रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की 13 डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास महामार्गावरील खेडी शिवारातील हॉटेल न्यु महेंद्रा ढाबा येथे अनिल छबीलदास चौधरी व मुकेश दत्तात्रय माळी हे जेवण करण्यास आले होते. जेवण आटोपल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या इतर लोकांमधे कोणत्यातरी कारणावरुन जोरदार हाणामारी झाली होती. या हाणामारीनंतर केदारनाथ वामन सानप याने त्याचेकडे असलेले रिवॉल्वर बाहेर काढले होते. रिव्हाल्व्हर काढल्यानंतर हा वाद कसाबसा मिटला होता.
या घटनेबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला समजली होती. या घटनेबाबत खात्री करण्यासाठी पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी रामकृष्ण पाटील, स.फौ. आनंदसिंग पाटील, स.फौ.अतुल वंजारी, पो.हे.कॉ.जितेंद्र राजपुत, पो.कॉ. किशोर पाटील, मुकेश पाटील, पो.कॉ. सचिन पाटील अशा सर्व जणांचे पथक हॉटेल न्यु महेंद्रा ढाबा येथे गेले होते.
या ढाब्यावरील व्यवस्थापकास विचारपुस तसेच तेथील सीसीटीव्ही तपासले असता त्यात घडलेला प्रकार उघड झाला. ढाबा सुरु असतांना घटनेच्या दिवशी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास मुकेश दत्तात्रय माळी (नगरसेवक सुनील माळी यांचा भाऊ) व त्यांच्यासोबत तिन ते चार जण जेवण करण्यासाठी आलेले होते. काही वेळाने भुसावळचे अनिल छबीलदास चौधरी यांच्यासोबत भगत बालाणी व इतर तिघे जण देखील तेथे जेवण करण्यासाठी आले. सर्वांचे जेवण आटोपल्यानंतर संतापातअनिल चौधरी यांनी तेथे असलेल्या खुर्चीला जोरात लाथ मारली. ती फेकली गेलेली खुर्ची एका कुत्र्याला लागली. कुत्र्याला खुर्ची जोरात बसल्यामुळे कुत्रा किंचाळला. त्यानंतर तेथील वातावरण बिघडले.
मुकेश दत्तात्रय माळी व अनिल छबीलदास चौधरी यांच्यात जोरदार बाचाबाची सुरु झाली. यावेळी दोन गट एकमेकांवर भिडले. त्यावेळी अनिल चौधरी यांचे सोबत असलेल्या केदारनाथ वामन सानप यांनी कमरेला लावलेले रिव्हाल्व्हर बाहेर काढले. रिव्हाल्व्हर बाहेर निघताच दोन्ही पक्षातील वाद कसाबसा शमला.
या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका गटातील अनिल छबीलदास चौधरी, केदारनाथ वामन सानप, दुर्गेश ठाकुर व अनिल चौधरी यांचा ड्रायव्हर गोलु, सर्व रा. भुसावळ तसेच भगत रावलमल बालाणी रा. जळगाव तसेच दुस-या गटातील मुकेश दत्तात्रय माळी, छोटु पाटील व त्यांच्या सोबत असलेले काही जण असे दंगा व मारामारी करतांना दिसून आले. या घटनेत केदारनाथ सानप यांनी त्यांच्या कब्जातील रिव्हाल्व्हर बाहेर काढल्याचे दिसून आले.
या घटनेप्रकरणी पो.कॉ. मुकेश अनिल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उप निरिक्षक रामकृष्ण पाटील करत आहेत.