जळगाव : भडगाव तालुक्यातील वडगाव सतीचे या गावी बालकाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी मयत बालकाच्या मृत्यूप्रकरणी संशयीत काकाला अटक करण्यात आली असून खूनाचे कलम वाढवण्यात आले आहे.
पैशांच्या वादातून सख्ख्या काकाने आयुष दिपक गायकवाड या वडगाव सतीचे (ता. भडगाव) येथील अवघ्या तीन वर्षाच्या बालकाचे अगोदर अपहरण करुन नंतर विहिरीत ढकलून दिल्याचा घटनाक्रम उघडकीस आला आहे. चोवीस तासात बालकाच्या मृत्यूचे गुढ उलगडण्यात पो.नि. अशोक उतेकर व त्यांच्या पथकाला यश आले आहे.
वडगाव सतीचे येथील दीपक गायकवाड यांचा मुलगा आयुष हा 14 डिसेंबरच्या दुपारपासून बेपत्ता झाला होता. त्याच्या बेपत्ता होण्यामुळे भडगाव पोलिस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आयुष याचा मृतदेह विहीरीत आढळून आला होता. संशयाच्या बळावर त्याचा काका निलेश रामदास गायकवाड यास पोलिस पथकाने ताब्यात घेतले होते.
ताब्यातील संशयीत निलेश गायकवाड याची 15 डिसेंबर रोजी कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबुल केला. भावासोबत असलेल्या पैशांच्या वादातून निरागस आयुषच्या कमरेवर लाथ मारुन त्याला विहीरीत फेकून दिल्याचे निलेश याने कबुल केले. या प्रकरणी भा.द.वि. 302 कलम वाढवण्यात आले आहे.






