रावेर (हमीद तडवी याजकडून)
रावेर तालुक्यात टिव्हीएस क्रेडिट फायनांस कंपनीच्या प्रतिनिधींचा धुमाकुळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. रावेर तालुक्यातील काही नागरिकांनी 5 ते 6 हजार रुपये डाऊन पेमेंट भरुन हप्त्याने सँमसंग कंपनीचे मोबाईल घेतले आहेत. लॉकडाऊन काळात आरबीआय ने दिलेल्या हप्ता स्थगितीचा पर्याय अनेक कर्जदारांनी निवडला आहे. तरी देखील टिव्हीएस फायनान्स कंपनीच्या तगाद्यामुळे ग्राहक इएमआय भरत असल्याचे समजते. मात्र कर्जाचे हप्ते (इएमआय) भरुन देखील टिव्हीएस क्रेडीट फायनांस कंपनीने आयएमइआय क्रमांकाचा वापर करुन ग्राहकांचे मोबाईल लॉक केले असून दंडासह इएमआय वसुली सुरु असल्याची ओरड होत आहे.
मोबाईलच लॉक झाल्यामुळे हप्त्याने घेतलेला मोबाईल वापरता येत नसल्याचे दिसून येत आहे. या ग्राहकांची अवस्था इकडे आड,तिकडे विहीर अशी झाल्याचे दिसत आहे. 3 ते 4 महिन्यांपासून लॉक केलेले आमचे मोबाईल सुरु करा अशी ग्राहकांची मागणी आहे. लॉकडाऊन काळात लॉक झालेले मोबाईल केव्हा अनलॉक होतील याची प्रतिक्षा या मोबाईलधारकांना लागून आहे.
टिव्हीएस क्रेडीट कंपनीच्या अशा कारभारामुळे कर्जदार ग्राहकांमधे संतापाची लाट पसरली आहे. सुरवातीला टिव्हीएस क्रेडिट कंपनी रावेर तालुक्यात आली तेव्हा या कंपनीने जाहिरातबाजी करुन ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षीत केले होते. शहरातील काही मोबाईल शॉपी डिलरने ग्राहकांना टिव्हीएस क्रेडिट कंपनीकडे वळवून आपला माल खपवला. ब्रँडेट कंपनीचा मोठा मोबाईल साधारण १८ हजार रुपयांपासुन पुढील किमतीत सर्वसामान्य ग्राहकांना जाहीरातबाजी करुन घेण्यास प्रवृत्त केले. हप्ते भरुन देखील लॉक झालेला मोबाईल अनलॉक होत नसेल तर आम्ही काय करावे असा यक्षप्रश्न ग्राहकांना पडला आहे.
हप्ते भरल्यावरही मोबाईल सुरु झाले नाही तर आम्ही मोबाईल फोडून टाकू अशी संतप्त भावना काही ग्राहक व्यक्त करत आहेत. मात्र असे केल्याने नुकसान संतप्त ग्राहकांचेच होणार आहे. मोबाईल सुरु झाला नाही तर आमचे पैसे आम्हाला परत मिळावे असेही काही ग्राहक बोलून दाखवत आहेत. या संपुर्ण प्रकाराकडे संबधित विभागाने व टिव्हीएस कंपनीच्या संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी रावेर तालुक्यातून होत आहे.