वीरगती प्राप्त जवान अमित पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जळगाव : ‘वीर जवान अमित पाटील अमर रहे’ च्या जयघोषात सीमा सुरक्षा दलाच्या 183 बटालियन मध्ये कार्यरत असलेले जवान अमित पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12.50 वाजता त्यांच्या मूळगावी वाकडी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बुधवार दि. 16 डिसेंबर रोजी जम्मूमधील पूंछ भागात अमित पाटील यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी वाकडी येथे शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साश्रूनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी वाय. एन. वाळेकर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रतिनिधी वाकडे यांच्यासह पाटील कुटुंबीय तसेच पंचक्रोशीतील शोकाकुल ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

सुरुवातीला वीर जवान अमित पाटील यांच्या पार्थिवास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मानवंदना देत पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर आमदार गिरीश महाजन, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, उप विभागीय अधिकारी साताळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी कातकडे, तहसिलदार मोरे यांच्यासह विविध मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.

तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता अमित यांचे पार्थिव घरी आणले आले. कुटूंबिय व नातेवाईकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून शोकाकूल वातावरणात त्यांची अंतिम यात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेच्या पुढे तिरंगा घेत तरुण चालत होते. फुलांनी सजविलेल्या वाहनातून त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली. वाकडी गाव आणि परिसरातून अंत्ययात्रा मैदानात आली. त्यानंतर त्यांना पोलिस दल व सीमा सुरक्षा दलातर्फे हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवास त्यांचे कनिष्ठ बंधूंनी अग्नीडाग दिला.

वीर जवान अमित पाटील यांच्या पश्चात वडील साहेबराव पाटील, आई सकुबाई पाटील, पत्नी वैशाली, एक मुलगा, एक मुलगी, एक बहिण, एक भाऊ असा मोठा परिवार आहे. यावेळी विविध मान्यवर व्यक्ती, संस्थांच्यावतीने वीर जवान अमित पाटील यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here