मुंबई : गेल्या काही दिवसापासून उच्चांक गाठणा-या शेअर बाजार निर्देशांकांना ब्रिटनमधील वाढलेल्या कोरोना व्हायरसने चांगलाच हादरा बसला आहे. ब्रिटनमधील वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे जगभरातील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होवून बाजार खाली आल्याचे दिसुन आले. दिवसाच्या अखेरीस सेन्सेक्स 1400 अंशांनी खाली आला होता. शेअर बाजाराने गेल्या सात महिन्यात मोठी घसरण बघण्यास मिळाली. या चढ उतारामुळे गुंतवणूकदारांची जवळपास सात लाख कोटी रुपयांची संपत्ती बुडाल्याचे म्हटले जात आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू लागल्यामुळे युरोपसह विविध देशांनी ब्रिटनला जाणारी विमानसेवा रद्द केली. याशिवाय ब्रिटनमधून आपल्या देशात येण्यावर देखील बंधने लागू केली आहे. याचा परिणाम सोमवारी जगभरातील शेअर बाजारावर दिसून आला.
मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक जवळपास 200 अंशांनी खाली येत खुला झाला. त्यानंतर, बाजारावर विक्रीचा जोर वाढला. त्यामुळे संवेदनशील निर्देशांक बराच खाली कोसळला. शुक्रवारच्या दिवशी बाजार बंद झाल्यानंतर मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत आस्थापनांचे बाजार भांडवल असलेले मूल्य जवळपास 185.36 लाख कोटी रुपये एवढे होते. ते सोमवारी 178.79 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले.