जळगाव : महिलेवर शेतात वेळोवेळी शारीरिक अत्याचार करणा-या फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे. आरोपी बसने जळगावला येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला समजली होती. त्यानुसार जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवर सापळा रचून त्याला अटक करण्यात पथकाला यश आले.
कैलास तुकाराम धाडी (रा. लोणवाडी ता.जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला पुढील तपासकामी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पिडीत महिला व तिची आई कैलास धाडी याच्या शेतात कामाला जात होते. शेतातील काम करत असतांना पिडीत महिलेस शेतातील पत्री शेडमध्ये आरोपी कैलास वेळोवेळी बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवत असे. याबाबत पिडीतेने एमआयडीसी पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 799/20 भा.द.वि. 376, 506 नुसार गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी कैलास तुकाराम धाडी हा फरार होता. कैलास धाडी हा बसने जळगावला येत असल्याची गोपनीय माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस उप निरिक्षक रामकृष्ण पाटील, पो.हे.कॉ.शरद भालेराव, नरेंद्र वारुळे यांच्या पथकाला अंजिठा चौफुलीवर तैनात केले होते. सकाळी सहा वाजता संबंधीत बस अजिंठा चौफुलीवर येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्याला एमआयडीसी पोलिसांच्य स्वाधीन करण्यात आले आहे.