वर्धा: नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून मुलाखतीसाठी फार्महाऊसवर आलेल्या एका विवाहितेवर सहा जणांच्या टोळीने सामूहिक अत्याचार प्रकरणी सावंगी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलिस कोठडीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सिंदी (रेल्वे) येथील एका विवाहित महिलेला पवनार येथील शेखर सुरेश चंदनखेडे याने नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने सावंगी (मेघे) येथे बोलावले होते. सदर महिला पतीसह सावंगी येथे आली असता शेखरने तिच्या पतीला कारमध्ये बसण्यास सांगून सेलसुरा येथील फार्महाऊसवर नेले. त्याठिकाणी अगोदरच पाच तरुण हजर होते. तिच्या पतीला बांधून ठेवत पीडितेवर सर्व तरुणांनी सामुहिक अत्याचार केला.
सर्व नराधमांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पिडीत महिलेने सावंगी पोलिस स्टेशन गाठत अत्याचार करणा-या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शेखर सुरेश चंदनखेडे (२४), लोकेश उर्फ अभिजित गजानन इंगोले (२४), हेमराज बाबा भोयर (३९), नितीन मारोतराव चावरे (२७), राहुल बनराज गाडगे (२८) व पनिंदाकुमार श्रीनिवास बलवा (२६) यांना पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्या सर्वांना पोलिस कोठडी सुनावली आहे.