अज्ञात वाहनाच्या धडकेत पत्नी ठार – पती जखमी

On: December 24, 2020 7:54 PM

जळगाव : भुसावळ येथील नातेवाईकाचे लग्न आटोपून जळगावच्या दिशेने दुचाकीने परत येणा-या दाम्पत्यावर आज सायंकाळी काळाने झडप घातली. जळगाव येथील प्रभात कॉलनी परिसरात राहणारे लीना किशोर तळेले व त्यांचे पती किशोर हिरामण तळेले हे दाम्पत्य भुसावळ येथे लग्नसमारंभात गेले होते. लग्नकार्य आटोपून ते जळगावच्या दिशेने दुचाकीने परत येत होते. दरम्यान महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपानजीक सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत दोघे दाम्पत्य जोरात फेकले गेले. या अपघातात लिना तळेले या ठार झाल्या. त्यांचे पती किशोर तळेले हे गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ हजर झाले. मयत लिना तळेले यांचा मृतदेह लागलीच सामान्य रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय अपघातामुळे ठप्प झालेली वाहतुक सुरळीत सुरु करण्यात आली. या प्रकरणी पुढील कारवाई पोलिस उपनिरीक्षक विशाल वाठोरे व सचिन मुंडे करत असून धडक देणा-या अज्ञात वाहनाचा शोध जारी आहे

जळगाव – भुसावळ दरम्यान महामार्ग हा जणू काही मृत्यूचा सापळा झाला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून वाहनधारकांसह त्यांच्या वाहनाची जणू काही परिक्षा घेण्याचे काम सुरु आहे. महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे जागोजागी कच पडला असून दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. याशिवाय धुळीचा त्रास देखील मोठ्या प्रमाणावर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment