मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सलमा आगा यांची अभिनेत्री असलेली कन्या तसेच गायिका झारा खान हिला धमकी देणाऱ्या महिलेस बुधवारी ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे.
नेहा सरवर (39) असे धमकी देणाऱ्या महिलेचे नाव आहे.ती एका खासगी कंपनीत काम करते. बॉलीवूडमधील अन्य काही सेलिब्रिटींनाही तिने अशाच पद्धतीने धमकावल्याची माहिती पुढे आली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
सोशल मीडियावरून शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची तक्रार झाराने ओशिवरा पोलिस स्टेशनला दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास सुरु केला होता. तपासात हैदराबाद येथे राहणाऱ्या नेहाची माहिती तपासात पोलीसांना मिळाली. तिला 19 डिसेंबर रोजी पोलीस स्टेशनला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. मात्र ती हजर झाली नाही. त्यानंतर तिला पुन्हा नोटीस बजावण्यात आली.बुधवारी ती ओशिवरा पोलीस स्टेशनला आल्यावर चाैकशीअंती तिला अटक करण्यात आली.
झारा खानसह तिने साहिल पीरजादे, कुशल टंडन, कमाल खान, एजाज खान यांना देखील अशाच पद्धतीने धमकावल्याचे उघड झाले.आरोपी महिलेने अशा प्रकारे बनावट आयडी तयार करुन आणखी काही लोकांना धमकावले आहे का? याची चौकशी करण्यात येत आहे.
नेहा सोशल मीडियावर पुरुषांच्या नावे बनावट आयडी तयार करुन धमकी देत हाेती. झारा स्वतःला ‘मेसेंजर ऑफ गॉड’ (देवाचा संदेश देणारी महिला) समजते.