नाशिक : नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत कोरोनाचा शिरकाव झाला असून 167 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
आठ दिवसांत मनपाच्या आरोग्य विभागाकडून एकूण 894 संशयित रुग्णांची कोविड तपासणी करण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत 167 प्रशिक्षणार्थी उप निरीक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी 127 रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय उपचार सुरु आहेत.
लॉकडाऊनपासून पोलीस अकॅडमीमधून प्रशिक्षणार्थी उमेदवार तसेच स्वयंपाकीसह चतुर्थ वर्गातील सर्व कर्मचा-यांना मुख्य उंबरठा ओलांडण्यास मनाई केलीआहे. बाहेरून येणाऱ्या सर्व वाहनांना अकॅडमीच्या प्रवेशद्वारावरच निर्जंतुक केल्यानंतर प्रवेश देण्यात येत आहे. अधिकारीवर्गाला देखील तपासणी करुनच प्रवेश देण्यात येत आहे.
कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे येत्या जानेवारी महिन्यात पूर्ण होणारे पोलीस उपनिरीक्षकांच्या 2020 च्या बॅचचे प्रशिक्षण आता लांबणीवर पडण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रशिक्षण रखडले आहे.
नातेवाइकाच्या लग्नासाठी एक प्रशिक्षणार्थी प्रवास करुन आल्यानंतर कोरोनाचा शिरकाव अकॅडमीत झाल्याचे म्हटले जात आहे. बहुतांश संशयितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.