घातक हत्यारासह घरफोडीतील आरोपी एलसीबीने पकडले

जळगाव : लाठी शाळेच्या वरील मजल्यावर असलेल्या महानगरपालिकेच्या कार्यालयातून जुलै महिन्यात चोरी झाली होती. या घटनेत चोरट्यांनी संस्थेच्या कार्यालयाचा दरवाजा तोडून 69 हजार रुपयांचे तिन संगणक संच, 2 प्रिंटर, बॅटरीसह 1 इन्व्हर्टर चोरुन नेले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबी कडून सुरु होता

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या गुन्ह्याचा उलगडा लावला आहे. लक्ष्मी नगर परिसरातील काही तरुण संगणक व प्रिंटर विकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहीती पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. संजय हिवरकर, हे.कॉ. राजेश मेंढे, हे.कॉ. रवी नरवाडे, सुनील दामोदरे, पो.कॉ. पंकज शिंदे, पो.कॉ.अविनाश देवरे, भगवान पाटील,सचिन महाजन, नंदलाल पाटील, महेश महाजन, जयंत चोधरी यांचे पथक तयार करण्यात आले.

या पथकाने तेथे जावून खात्री केली असता तेथे अविनाश रामेशवर राठोड (21) रा.रामेश्वर कॉलनी व दिपक जयलाल पटेल (19) रा. कुसुंबा हे प्राप्त माहितीनुसार साहित्यासह मिळून आले. त्यांना चौकशीकामी ताब्यात घेतले असता त्यांनी लाठी शाळेतील मनपा कार्यालयातील चोरीची कबुली दिली. त्यासोबतच आकाश उर्फ राधे अजय सोनार (लक्ष्मी नगर ढाकेवाडी) व गणेश भास्कर सोनार या दोघा साथीदारांची नावे उघड केली.

यातील आकाश यास पकडण्यात आले मात्र गणेश हा बाहेरगावी पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याचा शोध सुरु आहे. आकाशच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात एक गावठी पिस्तुल, सहा जिवंत काडतुसाह एक छ-यांची पिस्तुल, तलवार, लोखंडी सुरा असे शस्त्र मिळून आले. त्याच्या घराजवळ उभी असलेल्या पल्सर गाडीविषयी विचारपुस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसी खाक्या बघून त्याने ती गाडी चोरीची असल्याचे कबुल केले.
सदर पल्सर वाहन हे कुख्यात गुन्हेगार सुशील मगरे याचा साथीदार व कुख्यात सराईत गुन्हेगार जिगर उर्फ भुषण बोंडारे याची असल्याचे पथकास समजले. आकाशचा या दोघा आरोपींसोबत घनिष्ठ संबध असल्याचे तपासात व चौकशीत निष्पन्न झाले.

ताब्यातील सर्व आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली. तपासात मिळून आलेल्या हत्याराबाबत हत्यार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील आरोपींना पुढील तपासकामी एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here