नाशिक : नॉयलॉन मांजाने आतापर्यंत कित्येक निष्पाप पक्षांचा जिव घेतल्याचे आपण ऐकले आहे. मात्र हा नॉयलॉन मांजा आता मानवी जिवांवर देखील उठला आहे. नाशिक येथील एका दुचाकीस्वार नोकरदार महिलेचा जिव या नॉयलॉन मांजाने घेतल्याची घटना घडली आहे. पतंगाच्या तुटलेल्या मांजाने दुचाकीस्वार महिलेचा गळा चिरला गेल्याने मृत्यू ओढवल्याची घटना घडल्याने नाशिककरांच्या संतापात भर पडली आहे.
भारती मारुती जाधव (46) सिद्धीविनायक टाऊनशिप, साईनगर, अमृतधाम असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्या सातपूरच्या खासगी कंपनीतील कामकाज आटोपून त्यांच्या ताब्यातील दुचाकीने (एमएच 15- 5954) 28 डिसेंबरच्या सायंकाळी घरी परतत होत्या. द्वारका चौकातील उड्डाणपूलावरुन त्यांनी दुचाकी पुढे नेली असता अचानक हवेतून तुटून आलेल्या नायलॉन मांजाचा फास भारती जाधव यांच्या गळ्याला बसला. त्यामुळे त्या रस्त्यावर कोसळल्या. दरम्यान रस्त्याने जाणा-या काही वाहनचालकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ जखमी जाधव यांना जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारार्थ हलवले. यावेळी डॉक्टरांनी भारती जाधव यांना मयत घोषित केले.