मुंबई – एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षार्थींना आता मर्यादा देण्यात आल्या आहेत. नवीन वर्ष सन 2021 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीरात निघालेल्या प्रत्येक परीक्षेसाठी हा नियम लागू राहणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणेच आता राज्य लोकसेवा आयोगाने देखील विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी मर्यादा ठेवल्या आहेत. ठेवण्यात आलेल्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत आज परीपत्रक काढले आहे. विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची कमाल मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सहा वेळा ही परीक्षा देण्यात येईल. अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या मर्यादेपासून मात्र सूट देण्यात आली आहे. इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नऊ वेळा एमपीएससीची परीक्षा देण्यात येईल. आयोगाने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा अधिक संधी घेतल्यास किंवा अधिकवेळा परीक्षा दिल्यास संबंधित विद्यार्थी किंवा उमेदवारास नोकरीचा लाभ घेता येणार नाही.
विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेसाठी अर्ज केल्यानंतर अथवा पूर्व परीक्षा दिल्यानंतर ती संधी समजली जाईल. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सहा प्रयत्नातच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. एमपीएससी परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी शेवटची संधी म्हणून वयाच्या मर्यादेपर्यंत परीक्षा देत होते. त्यामुळे, एकाच स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी परीक्षार्थींचा कस लागत होता. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना डेडलाईन निश्चित करता येईल.