लग्नात व-हाडींच्या रुपातील लुटारु अटकेत

नाशिक : सध्या लग्नसराई सुरु आहे. वर वधू सह व-हाडी मंडळी कार्यक्रमात, जेवणात आणि मिरवणूकीत सामील झाल्यानंतर खोलीतील दागीन्यांवर हाथ की सफाई दाखवणारे लुटारु प्रत्येक लॉन व मंगल कार्यालयात हजरच असतात. त्यासाठी प्रत्येक व-हाडीने सतर्क राहणे गरजेचे असते.

नाशिक शहर व परिसरातील विविध लग्नसमारंभात मौल्यवान दागिने चोरी होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. वऱ्हाडी असल्याचा बनाव करत लग्नाला हजेरी लावून रेकी करत मौल्यवान दागिन्यांवर हात मारणा-या आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाला मोठे यश आले आहे. या टोळीला मध्यप्रदेशातील इंदोर येथुन ताब्यात घेण्यात आले आहे.

डिसेंबर महिन्यात गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका लॉन्समध्ये लग्न सोहळा होता. या लग्न सोहळ्यात 16 तोळे सोन्याचे दागीने व 1 लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी गेली होती. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्याचा तपास सुरु होता.

पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी गुन्हे शाखा युनीट-1 च्या पथकाला याबाबत तपासाचे निर्देश दिले होते. या पथकाने तपास सुरु केला होता. या गुन्ह्यातील गुन्हेगार मध्यप्रदेशातील असण्याची शक्यता गृहीत धरुन तपास सुरु करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंद वाघ, सहायक निरिक्षक महेश कुलकर्णी, येवाजी महाले, विशाल काठे यांच्या पथकाने त्रोटक माहितीच्या आधारे मध्यप्रदेशमधील इंदोर शहर गाठले. इंदोरसह परिसरात सलग तिन दिवस पथकाने माहिती घेत सापळे रचले. मात्र गुन्हेगार हाती लागत नव्हते.

मिळालेल्या एका माहितीच्या आधारे पोलिस पथकाने एका संशयीत कारवर पाळत ठेवली. एका ढाब्याच्या परिसरात त्या कारवर (एमपी 04 टीसी 1332) पाळत ठेवून सापळा रचण्यात आला. त्या कारमधून संशयीत आले असता साध्या वेशातील पोलिस पथकाने त्यांच्यवर झडप घातली. अजयसिंग कप्तानसिंग सिसोदिया (25), बादल कृष्णा सिसोदिया (19), पर्वतसिंग मिस्त्रीलाल सिसोदिया (45),तिघे रा. गुलखेडी, पिपलीयारसोडा, जि.राजगड, मध्यप्रदेश अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. या तिघांकडून गुन्ह्यात वापरलेल्या कारसह तिन मोबाइल जप्त करण्यात आले. तिघांना गंगापुर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता 5 जानेवारी पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

या टोळीने आतापावेतो नाशिकसह पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, संगमनेर, गुजरात राज्यातील सुरत, वापी, अहमदाबाद, तलासुरी, नवसारी आदी शहरांमध्ये अशाच पद्धतीने दागिने व रोकड लांबवली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here