खाद्यतेल चोरणारी गुजरात राज्यातील टोळी जेरबंद

जळगाव : सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचे खाद्यतेल चोरुन नेणा-या टोळीचा पर्दाफाश जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे. या टोळीतील तिघांना जेरबंद करण्यात आले असून पुढील तपासकामी वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात 23 डिसेंबर व 24 डिसेंबर दरम्यान रात्रीच्या वेळी महामार्गानजीक वरणगाव जवळ उभ्या असलेल्या ट्रकमधून (एमएच 19 सीवाय 6002) 7 लाख 37 हजार 345 रुपये किमतीचे खाद्य तेल चोरी होण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी वरणगाव पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक स्वप्निल नाईक, सहायक फौजदार राजेंद्र पाटील, पो.हे.कॉ. अशरफ शेख, दादाभाऊ पाटील व दिपक पाटील करत होते. पो.नि. किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी पथकास शिरपुर ते चोपडा बायपास रस्त्यावर पथकाला रवाना केले. या ठिकाणी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयीत इसम आढळून आले. त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी करण्यात आली. वरणगाव नजीक तेलाचे बॉक्स भरलेल्या ट्रकमधुन चोरी केल्याचे त्यांनी कबुली दिली.

इद्रीस मोहम्मद कालु (38), मोहम्मद बशीर शेख, शोएब हुसेन जभा तिघे राहणार गोध्रा गुजरात यांना पुढील तपासकामी वरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास स.पो.नि. संदीपकुमार बोरस्र करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here