अहमदनगर : रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित सुत्रधार बाळ बोठे यास फरार घोषित करण्यासाठी पोलिसांनी स्टँडिंग वॉरंट अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर आज सोमवारी पारनेर न्यायालयात सुनावणी होणार आहे. शोध घेऊनही बोठे सापडत नसल्यामुळे त्याच्याविरोधात अन्य मार्गाने फास आवळण्यासाठी पोलिस कायदेशीर तरतुदींचा आधार घेत आहे.
जरे यांची हत्या झाल्यानंतर बोठे अहमदनगर शहरातून पसार झाला आहे. गेल्या महिनाभरापासून पोलीस त्याचा सातत्याने शोध घेत आहेत. तो मात्र प्रत्येकवेळी पोलिसांना चकवा देत आहे. रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात आरोपींच्या विरोधात पोलिसांनी महत्वाचे पुरावे जमा केले आहेत. आता फक्त बाळ बोठे याच्या अटकेचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. फरार होताना बोठे याने स्वत:चा मोबाइल फोन मात्र घरीच ठेवला आहे. त्यामुळे लोकेशन काढून शोध घेण्याचा पर्याय संपुष्टात आला आहे.