जळगाव : वेळ दुपारची…… स्थळ जळगाव शहरातील स्टेडीयम परिसर ते मध्यवर्ती बस स्थानक दरम्यान. रस्त्यावर रडणारी सुमारे पाच ते सहा वर्षाची बालिका. रडून रडून तिचे डोळे कोरडे झालेले आणि घशाला कोरड पडलेली. रस्त्याने येणा-या जाणा-या भरधाव वेगातील वाहनधारकांचे तिच्याकडे बघून दुर्लक्ष. तशातच तेथून जाणा-या जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे प्रविण भोसले व प्रमोद पाटील यांचे तिच्याकडे लक्ष गेले.
रडून रडून थकलेल्या त्या बालीकेला धड बोलता देखील येत नव्हते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला तिला आपल्या दुचाकीवर बसवून जिल्हापेठ पोलिस स्टेशनला आणले. त्यांनी सर्व प्रथम तिला खायला बिस्कीट व पिण्यास पाणी दिले. त्यानंतर तिच्यावर मायेची फुंकर घालून तिची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
बाळ रडू नकोस….. मला सांग तुझे नाव काय? तुझी आई कुठे आहे? तु कुठे राहते? अशा एकामागून एक परंत सुनियोजीत पद्धतीने त्या बालिकेची विचारपुस केल्यानंतर तिने तिचे नाव कथन करत घटनाक्रम कथन केला.
दिप्ती देवानंद मेढे (अंदाजे वय 5 वर्ष) ही तांबापुरा टिपु सुलतान चौक येथील रहिवासी बालीका आपल्या आईसमवेत स्टेट बॅकेच्या मुख्य शाखेत आली होती. गर्दीत तिची व आईची ताटातुट झाली. हरवलेली बालीका थेट रस्त्यावर येवून रडू लागली. वाट दिसेल तिकडे जावू लागली. त्यामुळे तिला जिल्हा पेठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी प्रविण भोसले व प्रमोद पाटील या दोघांनी तिची विचारपुस करुन तिच्याकडून माहिती काढली.
त्या बालिकेने दिलेल्या माहितीनुसार तिच्या आईचा शोध स्टेट बॅकेच्या मुख्य शाखेत घेण्यात आला. तिची आई वैशाली मेढे ही स्टेट बॅकेच्या परिसरात उदास चेह-याने लेकीच्या विरहात बसून होती. आपल्या लेकीला पोलिसांसमवेत पाहिले असता तिच्या आनंदाला उधान आले. मात्र दुस-याच क्षणी तिच्या डोळ्यात अश्रूंची गंगा वाहू लागली. दोघा मायलेकींना सोबत पाहून खाकी देखील काही क्षण स्तब्ध झाली. आपल्यामुळे मायलेकींची भेट झाल्याचे समाधान जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी प्रविण भोसले व प्रमोद पाटील यांच्या चेह-यावर झळकत होते.